चिमूर बस्थानक परिसरात २०० मीटरच्या आत अवैध प्रवासी वाहतूक; स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष, अपघातांची शक्यता वाढली
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील क्रांती भूमी म्हणून देशभर ओळख असलेल्या चिमूर शहरात आजही स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या घटना अभिमानाने सांगितल्या जातात. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच इंग्रजांविरोधात उठाव करून चिमूर आणि आष्टी परिसरातील नागरिकांनी ब्रिटिश सत्तेला हादरा दिला होता. अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती देत स्वातंत्र्याचा झेंडा फडकावला. मात्र आज त्याच ऐतिहासिक शहरात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून चिमूर बसस्थानक परिसरात सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-ई लगत असलेल्या चिमूर बसस्थानक परिसरात नियमांना हरताळ फासत टाटा सुमो, ट्रॅव्हल्स मिनी बस तसेच इतर खासगी वाहने उघडपणे प्रवासी भरून वाहतूक करीत असल्याचे चित्र दररोज पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र मोटार वाहन नियमांनुसार व सार्वजनिक वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहनांनी प्रवासी उचलणे किंवा थांबा घेणे नियमबाह्य मानले जाते. असे असतानाही संबंधित वाहनचालकांकडून सर्रासपणे नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
या परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर यापूर्वी अनेक भीषण अपघात घडले आहेत. अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही दिवसांपूर्वीच बसच्या पुढील चाकाखाली दबून एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानादेखील प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे. अवैध वाहतुकीमुळे बसस्थानकासमोर सतत वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून प्रवाशांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे.
विशेष म्हणजे एकीकडे उप प्रादेशिक परिवहन विभाग चंद्रपूर यांच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा अभियान, हेल्मेट जनजागृती, वाहतूक नियमांचे पालन याबाबत विविध मोहिमा राबविल्या जात आहेत; मात्र दुसरीकडे बसस्थानक परिसरातच अवैध प्रवासी वाहतूक उघडपणे सुरू असल्याने संबंधित विभागाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक पोलीस प्रशासन व वाहतूक विभागाकडून नियमित तपासणी होत नसल्यामुळे या अवैध वाहतुकीला जणू अभय मिळाल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
कायद्याच्या दृष्टीने पाहता, सर्वोच्च न्यायालयाने तसेच विविध उच्च न्यायालयांनी वेळोवेळी रस्ता सुरक्षा आणि सार्वजनिक वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत विनापरवाना प्रवासी वाहतूक करणे, निर्धारित ठिकाणांव्यतिरिक्त प्रवासी उचलणे तसेच सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणारी वाहतूक करणे हा गंभीर प्रकार मानला जातो. याशिवाय बसस्थानक परिसरातील अनधिकृत वाहतूक ही अपघातास कारणीभूत ठरल्यास संबंधित चालकांसह जबाबदार अधिकाऱ्यांवरही निष्काळजीपणाचा ठपका ठेवला जाऊ शकतो, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
नागरिकांच्या मते, बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही निरीक्षण वाढविणे, अवैध वाहनांवर दंडात्मक कारवाई करणे, वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करणे तसेच बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी वाहनांना प्रवासी घेण्यास सक्त मनाई करणारे फलक लावणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात आणखी एखादी जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
चिमूरसारख्या ऐतिहासिक आणि क्रांतीभूमीची ओळख असलेल्या शहरात नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!