उमरी (अड्याळ) येथे रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात
190 मजुरांना मिळाला रोजगार; महिलांचा मोठा सहभाग
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - तालुक्यातील अड्याळजवळील उमरी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत गगनी तलाव खोलीकरण (गाळ काढणे) कामाला दि. 27 मे 2026 रोजी सुरुवात करण्यात आली. या कामामुळे गावातील शेकडो मजुरांना रोजगार उपलब्ध झाला असून परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
तलाव खोलीकरण कामाचे उद्घाटन सरपंच शशिकला शिवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच राष्ट्रपाल भोयर, ग्रामपंचायत सदस्य शोभिवंत गेडेकर, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा चंदनबावणे, ग्राम रोजगार सहाय्यक गुणवंत लोणारे, मजूर मेट देवचंद भुजाडे, सौरभ शिवूरकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या या तलाव खोलीकरणाच्या कामावर सध्या 190 मजूर कार्यरत आहेत. यामध्ये 120 महिला व 70 पुरुष मजुरांचा समावेश आहे. गावातच रोजगार उपलब्ध झाल्याने मजुरांना स्थलांतर करण्याची गरज भासत नसून त्यांच्या आर्थिक उत्पन्नातही भर पडत आहे.
तलावातील गाळ काढल्यामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत होणार असून भविष्यात शेती व पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेलाही फायदा होणार आहे. रोजगार निर्मितीसोबतच जलसंधारणाचे उद्दिष्ट साध्य करणारे हे काम ग्रामस्थांसाठी लाभदायक ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
ग्रामस्तरावर रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने मजुरांमध्ये आनंदाचे वातावरण असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!