एकीकडे श्रमदान, दुसरीकडे निवेदन; मूल शहरातील पाणी प्रश्नाची नवी कहाणी

प्रभाग क्र. १ मधील पाणीटंचाईवर युवकांचा पुढाकार; विहिरीची स्वच्छता करून दिलासा


मूल प्रतिनिधी : मूल शहरातील प्रभाग क्र. १ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरातील विहिरीचे पाणीही दूषित व पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांची गैरसोय वाढली होती.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी नगर परिषद अध्यक्षा एकता समर्थ यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, सुमारे महिनाभर उलटूनही प्रश्न मार्गी न लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. विशेष म्हणजे, अध्यक्षा एकता समर्थ या स्वतः या प्रभागाशी संबंधित असून त्यांचे पती प्रशांत समर्थ हे देखील या प्रभागाचे नगरसेवक आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या होत्या.
दरम्यान, प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचे पाहून प्रभागातील युवकांनी स्वतः पुढाकार घेत विहिरीचा उपसा व स्वच्छता मोहीम हाती घेतली. संकेत निकुरे, शिव शेंडे, प्राचित वाढगुरे, प्रेषित निकोडे आणि सुमित मोहुर्ले या युवकांनी श्रमदानातून विहिरीतील गाळ व कचरा काढून स्वच्छतेचे काम केले.
युवकांच्या या सामाजिक उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. केवळ समस्या मांडण्यापेक्षा तिच्या निराकरणासाठी स्वतः पुढे येण्याची भूमिका या युवकांनी कृतीतून दाखवून दिली आहे.
दरम्यान, प्रभागातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
......
प्रभाग क्र. १० मधील बोअरवेल बंद; नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
मूल  शहरातील प्रभाग क्र. १० मध्ये मंदाबाई कोल्हे यांच्या घराजवळील सार्वजनिक बोअरवेल अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या समस्येबाबत नागरिकांनी नव-निर्वाचित नगरसेवकांकडे वारंवार पाठपुरावा करून बोअरवेल दुरुस्त करण्याची मागणी केली होती. मात्र, याकडे कोणतेही लक्ष देण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी अखेर नगर परिषद प्रशासनाकडे धाव घेतली.
यासंदर्भात प्रभाग क्र. १० मधील दिलीप रामटेके (अध्यक्ष, अनुसूचित जाती मोर्चा, भाजप, मूल शहर), सौ. रूपा बन्सोड, श्री. मडावी तसेच वार्डातील इतर नागरिकांच्या सह्यांचे निवेदन नगर परिषद, मूलचे मुख्याधिकारी यांना सादर करण्यात आले.
निवेदनामध्ये बंद पडलेली बोअरवेल तातडीने दुरुस्त करून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची समस्या अधिक तीव्र होत असल्याने प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, संबंधित समस्येकडे नगर परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!