कोलारा येथे आदिवासी सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर तर्फे आयोजन

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जगप्रसिद्ध कोलारा गेट परिसरातील कोलारा (तु.) येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आदिवासी सांस्कृतिक महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महोत्सवामध्ये आदिवासी समाजाची कला, संस्कृती, परंपरा आणि लोकजीवनाचे दर्शन घडविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी शरद चौधरी, डॉ. दिवाकर कुमरे, संजय ठाकरे, शोभा कोयचाडे, गणेश येरमे, सचिन डाहुले, नरेंद्र पंडीत, शारदा गावंडे, अमित लभाने, राहुल पुडके आणि बाळासाहेब वटाने यांची प्रमुख उपस्थिती होती.

या महोत्सवात परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, कलाकार तसेच मान्यवरांनी सहभाग घेतला. आदिवासी लोकनृत्य, पारंपरिक वाद्यांचे सादरीकरण, लोकगीते आणि विविध सांस्कृतिक स्पर्धांनी उपस्थितांची मने जिंकली.

सांस्कृतिक स्पर्धांमध्ये राय वाघीण ढेमसा ग्रुप, ताडोबा (खुटवंडा) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. राणी दुर्गावती डान्स ग्रुप, चक बोथली यांनी द्वितीय क्रमांक मिळविला, तर जयमूलनिवासी डान्स ग्रुप, कोलारा (तु.) यांनी तृतीय क्रमांकावर बाजी मारली.

महोत्सवाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच नव्या पिढीला आपल्या परंपरांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे प्रतिपादन प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर यांच्या कार्याचे कौतुक केले.

ग्रामपंचायत सदस्य गणेश येरमे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गावातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रकल्प कार्यालयाकडे उपहारगृहाचा प्रस्ताव सादर करून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे कोलारा (तु.) येथील जनजागृती उत्पादित महिला बचत गटाला उपहारगृह योजना मंजूर झाल्याची माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बचत गटाला मंजुरीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन सहायक प्रकल्प अधिकारी शरद चौधरी यांनी केले. स्नेहभोजनाने महोत्सवाची सांगता झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सर्व कर्मचारीवृंद, ग्रामपंचायत सदस्य गणेश येरमे, प्रफुल भरडे तसेच अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!