महाविकास आघाडीच्या शक्तीप्रदर्शनात शैलेश अग्रवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कार्यकर्त्यांच्या उत्साहाने ऐतिहासिक विजयाचा विश्वास; वरिष्ठ नेत्यांची एकजूट

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित करण्यात आलेली कार्यकर्ता मार्गदर्शन सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेत महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकजुटीचे दर्शन घडवत आगामी निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री रणजित कांबळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संदीप गिऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहराध्यक्ष शिवा राव, विनायक बांगडे व सुभाष गौर यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.

सभेत उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करण्यासाठी प्रत्येकाने पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे, असे आवाहन केले. कार्यकर्त्यांचा उत्साह, नेत्यांची एकजूट आणि जनतेचा वाढता पाठिंबा पाहता आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

"एकजूट, निर्धार आणि कार्यकर्त्यांची ताकद याच्या बळावर महाविकास आघाडी ऐतिहासिक विजयाची नोंद करेल," असा आशावाद नेत्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!