चिमूर शहरात विजेचा लपंडाव

उपजिल्हा रुग्णालयात अंधारामय वातावरण, नागरिक त्रस्त

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात कोणत्याही प्रकारचे खराब हवामान नसताना देखील दैनंदिन तासन्तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या विजेच्या लपंडावामुळे घरगुती तसेच व्यावसायिक विद्युत उपकरणांमध्ये बिघाड होऊ लागला असून नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोळसा खाणी व विविध मायनिंग प्रकल्प असल्यामुळे परिसरात प्रचंड उष्णता जाणवत आहे. अशा कडक उन्हाळ्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयातही काही काळ अंधारामय वातावरण निर्माण होत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

डिजिटल इंडियाच्या युगात बहुतांश कामे ऑनलाईन पद्धतीने होत असताना संगणक प्रणालीवर आधारित अनेक व्यवसाय आणि कार्यालयीन कामे ठप्प पडत आहेत. इंटरनेट सेवा, ऑनलाईन व्यवहार, शासकीय कागदपत्रे तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक काम यावरही परिणाम होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, वीज वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता तसेच सहाय्यक अभियंता हे या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. ग्राहकांनी अधिकाऱ्यांना शासनाने उपलब्ध करून दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अनेकदा कॉल उचलण्यात विलंब होत असल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे.

“योग्य मार्गदर्शन मागावे तरी कुणाला?” अशी अवस्था सध्या चिमूर शहरात निर्माण झाली असून नागरिकांनी तातडीने सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!