तेंदूपत्ता तोडणीसाठी गेलेल्या महिलेवर अस्वलाचा हल्ला

 


सावली - तालुक्यातील सादागड परिसरात अस्वलाच्या हल्ल्यात एका महिलेवर गंभीर जखमी होण्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

      सादागड येथील महिला गयाबाई शिवाजी मडावी (वय ६० वर्षे) रा. सादागड ही रविवारी सकाळच्या सुमारास गावालगतच्  जंगल परिसरात तेंदू पाने तोडण्याकरिता गेल्या असता अचानक अस्वल वन्यप्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर, कपाळावर तसेच चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

महिलेच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. नागरिकांचा आवाज ऐकताच अस्वल जंगलाच्या दिशेने पळून गेले. त्यानंतर जखमी महिलेला तात्काळ ग्रामीण रुग्णालय सावली येथे दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून परिसराची पाहणी करण्यात आली. सादागड परिसर जंगलालगत असल्याने वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!