चंद्रपूर गुन्हे शाखेची धडक कारवाई: कत्तलीसाठी नेले जाणारे १२ गोवंश मुक्त

चंद्रपूर गुन्हे शाखेची धडक कारवाई: कत्तलीसाठी नेले जाणारे १२ गोवंश मुक्त; ७ आरोपींसह ४ पिकअप वाहने जप्त



चंद्रपूर:

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने एक मोठी कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने होणारी १२ गोवंशांची अवैध वाहतूक यशस्वीरित्या हाणून पाडली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पथकाने दिनांक १७ मे २०२६ रोजी सकाळी ०७:०० वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशन भिसी अंतर्गत येत असलेल्या जांभूळघाट नेरी टी-पॉईंट येथे सापळा रचला. यावेळी संशयास्पद रित्या येणाऱ्या चार पिकअप वाहनांना थांबवून त्यांची झडती घेतली असता, त्यात अत्यंत क्रूरपणे, चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता कत्तलीच्या उद्देशाने १२ गोवंश (बैल) कोंबून नेले जात असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी दीपक योगराज कांबळे (रा. किटाली, तह. लाखनी), मधुकर सोमाजी समरत (रा. काथुर्ली, तह. पवनी), हरिदास तुकाराम माहुरे (रा. भावड, तह. पवनी), राजहंस आत्माराम नागपुरे (रा. पाथरी, तह. पवनी), राजकुमार दाजीराव मारबते (रा. पाथरी, तह. पवनी), चैतन्य विठ्ठल गजापुरे (रा. विरली खंदार, तह. पवनी) आणि गंगाधर रामकृष्ण मस्के (रा. काथुर्ली, तह. पवनी) या ७ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

​पोलिसांनी कारवाई दरम्यान MH 40 AK 1036, MH 34 AV 1580, MH 40 Y 7594, MH 34 BG 6781 या क्रमांकांची चार पिकअप वाहने जप्त केली आहेत. मुक्त करण्यात आलेल्या सर्व १२ बैलांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ‘तपोवनी वंदनीय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज गोशाळा गोंदेडा’, ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे. सदर कौतुकास्पद कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोलीस हवालदार नितीन कुर्जेकार, नितीन साळवे, प्रमोद कोटनाके, दिनेश आदापुरे आणि पोलीस अंमलदार अमोल सावे यांच्या पथकाने केली. या धडक कारवाईमुळे अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!