नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेतून कायमची मुक्ती
नाल्याचे काम अखेर मार्गी!
संजय पुरी वैकुंठे व धनराज उपरीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
नगराध्यक्ष विजयाताई नंदुरकर यांचे मानले आभार
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.१६/०५/२०२६ पवनी नगर परिषदेच्या पं.स.समोरील आणि बीएसएनएल कार्यालयाच्या पाठीमागील नाल्याच्या रखडलेल्या समस्येमुळे अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक आणि पंचायत समितीत येणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र,लोकहित लक्षात घेऊन करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर या नाल्याचे काम पूर्ण झाले असून,परिसराने सुटकेचा श्वास सोडला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या नाल्यामध्ये कचरा आणि सांडपाणी साचून राहत असल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत होती. त्यातच पावसाळ्यात या नाल्याची अवस्था अधिकच बिकट होत असे. नाल्यात घाण साचून पाणी तुंबत असल्याने संपूर्ण परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण व्हायचे,ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला होता.
जनहितासाठी सातत्यपूर्ण लढा: प्रशासकीय राजवटीच्या काळातही ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय पुरी वैकुंठे आणि धनराज उपरीकर यांनी सातत्याने प्रशासनाकडे आवाज उठवला.नागरिकांच्या मूलभूत हक्कासाठी आणि जनहितासाठी त्यांनी या समस्येचा सातत्याने पाठपुरावा केला.अखेर त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना यश आले असून नाल्याचे काम यशस्वीरीत्या मार्गी लागले आहे.
नगराध्यक्षांचे मानले आभार: या कामाला गती देऊन ते पूर्णत्वास नेण्यासाठी पवनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष डॉ.विजयाताई नंदुरकर यांनी विशेष सहकार्य केले.कामाची संवेदनशीलता ओळखून प्रशासकीय पातळीवर तत्परता दाखविल्याबद्दल संजय पुरी वैकुंठे,धनराज उपरीकर व समस्त परिसरातील नागरिकांच्या वतीने नगराध्यक्ष विजयाताई नंदुरकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून आभार मानले आहेत. नागरिकांना मोठा दिलासा: नाल्याचे काम पूर्ण झाल्यामुळे आता परिसरातील दुर्गंधी, अस्वच्छता आणि पावसाळ्यात पाणी साचण्याच्या गंभीर समस्येपासून नागरिकांना कायमचा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांची डोकेदुखी मिटल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!