काँग्रेसमध्ये प्रशांत उराडे यांच्यावर मोठी जबाबदारी

काँग्रेसमध्ये प्रशांत उराडे यांच्यावर मोठी जबाबदारी
सृजन संघटनात्मक अभियानांतर्गत मूल तालुका अनुसूचित जाती सेलच्या अध्यक्षपदी निवड


मूल : काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला गती देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “सृजन संघटनात्मक अभियान” अंतर्गत मूल तालुक्यातील युवा व चळवळीचे कार्यकर्ते प्रशांत उराडे यांची मूल तालुका काँग्रेस अनुसूचित जाती सेलच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने करण्यात आली असून, नियुक्तीची अधिकृत यादी नुकतीच जाहीर करण्यात आली.
प्रशांत उराडे हे मागील काही वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या तसेच संघटनात्मक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. तालुक्यातील युवक आणि वंचित घटकांमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क असल्याने पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे मूल तालुक्यात काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलला अधिक बळ मिळणार असून संघटन विस्ताराला गती मिळेल, असा विश्वास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, प्रशांत उराडे यांच्या नियुक्तीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!