वैनगंगा नदी काठावरील केळीची बाग पाण्याअभावी करपतेय - बोरमाळातील बागायतदार शेतकरी चिंतेत
सावली- सावली तालुक्यातील वैनगंगा नदी काठावरील बोरमाळा शेत शिवारात चार हेक्टर क्षेत्रात लावलेली केळीची बाग पाण्याअभावी करपत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. बारमाही वाहणारी नदी मात्र रेती उपसामुळे कोरडी पडलेली असतांना अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे.
सावली तालुका हा एकमेव शेती व्यवसायावर अवलंबून असलेला तालुका आहे. सावली तालुक्यात जवळपास ४० किलोमीटर पर्यंत वैनगंगा नदी वाहत असून काठावरील जमीन सुपीक आहे. तालुक्यात फक्त एक पीक घेत असतांना मात्र विहीरगाव येथील समीर विलास घरत व विकास पुरेल्लीवार ह्या दोन युवा शेतक-यांनी मोठ्या हीम्मतीने नाविन्यपूर्ण प्रयोग हाती घेत केळीची बाग लावलेली आहे. जळगांव येथील जैन एरीगेशन कडुन साडे बारा हजार टिश्यु कल्चर रोपांची खरेदी करुन जवळपास पंधरा लक्ष रुपयांची मोठी गुंतवणूक केली. या प्रयोगातून जवळपास चाळीस लक्ष रुपयांचे उत्पन्न होईल अशी आशा होती. परंतु पाण्या अभावी स्वप्नाचा चुराडा होत आहे. ऑगष्ट महिण्यात लावलेल्या केळीची बाग जोमात आली व घड धरल्यानंतर पाण्याची आवश्यकता असतांनाच ऐन उमेदीच्या काळात वैनगंगा नदीचा पात्र कोरडा पडल्याने मोटार पंपांद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. यापुर्वी नेहमी बोरमाळा बाजु कडील नदीच्या पात्रात मुबलक पाणी राहात असल्याने या शेतकऱ्यांनी साहस करुन चार हेक्टर जमीन भाड्याने घेऊन केळीची बाग लावली.परंतु पाण्या अभावी स्वप्न धुळीस मिटतील ही भीती निर्माण झाली आहे. याच परिसरात बोरमाळा वैनगंगा नदी घाटात गुणवत्तापूर्ण दर्जेदार रेतीचा साठा असल्याने मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होवुन पात्र खडकाळ झाला त्यामुळे पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे. जास्तीत जास्त रेती उपसा करून आपल्याला कसा वयक्तिक आर्थिक फायदा होईल याकडे सावली तालुका प्रशासनाचे लक्ष असून शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे. वैनगंगा नदीत पाणी नसल्यामुळे शेतीसाठी, पिण्याच्या पाणीसाठी, जनावरांसाठी गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडणे आवश्यक आहे मात्र त्याचा रेती उपसा करण्यासाठी अडचणी येतील याकरीता प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा आहे.
कोरडी पडलेली वैनगंगा नदीचे छायाचित्र...
सावलीच्या तहसीलदार चिरडे मॅडम घाटावर आले असता त्यांना भेटून आपबीती सांगायचे होते मात्र आमच्यासोबत पत्रकार असल्याने तहसीलदार दुर्लक्ष करीत निघून गेले. आता केळीची बाग कशी वाचवायची हा प्रश्न आमचे समोर आहे.
समीर घरत
विकास पुरेल्लीवार
केळी बागायतदार शेतकरी
केळीच्या बागेजवळ तहसीदारची गाडी असतांनाचे छायाचित्र.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!