चिमूर तालुक्यात अवैध धंद्यांना आला उत

पोलीस प्रशासन कोमात ?

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चिमूर तालुक्यात सध्या विविध प्रकारचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरासह ग्रामीण भागात सट्टा व्यवसाय, अवैध दारू विक्री, सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री, वेश्या व्यवसाय, वाळू चोरी, मुरूम चोरी, अवैध गिट्टी वाहतूक तसेच गांजाची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे अनेक ठिकाणी हे अवैध व्यवसाय दिवसाढवळ्या सुरू असूनही संबंधित यंत्रणा मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कायद्याचा धाक उरला नसल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे मनोबल वाढले असून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

चिमूर शहरात काही ठिकाणी सट्टा व्यवसाय खुलेआम सुरू असून तरुण पिढी या विळख्यात अडकत चालली आहे. तसेच अवैध दारूमुळे ग्रामीण भागात अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचेही बोलले जात आहे. दुसरीकडे सुगंधित तंबाखू व गांजाच्या विक्रीमुळे युवकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

याशिवाय तालुक्यातील नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र असून मुरूम व गिट्टीची अवैध वाहतूकही सुरू आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होत आहे.

स्थानिक आमदार तसेच पोलीस प्रशासन या सर्व प्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. “सर्व काही माहित असूनही कारवाई का होत नाही?” असा सवाल आता जनतेकडून उपस्थित केला जात आहे.

तालुक्यात वाढत चाललेल्या या अवैध धंद्यांवर तात्काळ कठोर कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशाराही काही सामाजिक संघटनांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!