चंद्रपूर पुन्हा हादरला : गुंजेवाहीत चार महिलांना वाघाने ठार केले, शासन मात्र मौनात!
गुंजेवाहीत वाघाचा थरारक हल्ला : तेंदूपत्ता गोळा करायला गेलेल्या चार महिलांचा मृत्यू
“जंगल आमचे, पण जीव मात्र असुरक्षित” — चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा पेटला मानव-व्याघ्र संघर्ष
गुंजेवाही परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या चार महिलांवर वाघाने भीषण हल्ला करून त्यांचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरला असून ग्रामीण भागात प्रचंड भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तेंदुपत्ता संकलनाकरिता एकूण सात महिलांचा गट जंगलात गेला होता. येथील दोन महिलांना वाघांनी पकडल्याने दोन महिलांनी आरडा ओरड केली. या महिलांनाही वाघाने पाटलाग करून ठार केले. तीन महिला मात्र कशीबशी तिथून निसटून रस्त्यावर आल्याने ही घटना गावकऱ्यांना कळली.
मृतकात १) सुनीता कौशिक मोहुरले (३५)
२) संगीता संतोष चौधरी (४०)
३) अनीता दादाजी मोहुरले (४५)
४) कविता दादाजी मोहुरले (४८)
यांचा समावेश आहे
यातील सुनिता कौशिक मोहुर्ले ही विधवा महिला असून, दोन वर्षांपूर्वी तिचे पती मरण पावले. सुनिता च्या मृत्यूने तिचे लहान दोन मुले अनाथ झाली आहे. यामुळे गावकऱ्यात दुःख व्यक्त केले जात आहे.
दरवर्षी तेंदूपत्ता हंगाम सुरू झाला की हजारो आदिवासी व गरीब कुटुंबातील महिला-पुरुष जंगलात उपजीविकेसाठी जातात. मात्र जंगलात आता वन्यप्राण्यांपेक्षा माणसांचाच जीव अधिक असुरक्षित झाला आहे. “घर चालवण्यासाठी जंगलात जावे लागते आणि परत येऊ की नाही याची खात्री नसते,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत मानव-व्याघ्र संघर्षाने भीषण स्वरूप धारण केले आहे. वाघांचे वाढते हल्ले, ग्रामीण भागातील दहशत, शेतकऱ्यांवरील संकट आणि जंगलालगतच्या गावांमध्ये निर्माण झालेली भीती — या सर्व प्रश्नांवर शासन व वन विभागाकडून केवळ बैठका आणि घोषणाच होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
विशेष म्हणजे, वन विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा गंभीर अभाव असल्याचे वारंवार समोर येत आहे. जंगल परिसरात गस्त वाढवणे, तातडीची अलर्ट यंत्रणा, ड्रोन सर्वेक्षण, धोकादायक क्षेत्रांमध्ये मानवी हालचालींवर नियंत्रण, प्रशिक्षित बचाव पथके, तेंदूपत्ता संकलनासाठी सुरक्षित वेळापत्रक अशा उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या जात नसल्याची टीका होत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याच्या वन प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्याचे वनमंत्री जिल्ह्यांमध्ये फिरून परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “मुंबई आणि ठाण्याच्या बैठका सोडून ग्रामीण महाराष्ट्रातील रक्तरंजित वास्तवाकडे शासन कधी पाहणार?” असा सवाल आता संतप्त जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
स्थानिक नागरिकांनी मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मोठी आर्थिक मदत, कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी, तसेच मानव-व्याघ्र संघर्ष रोखण्यासाठी विशेष कृती आराखडा जाहीर करण्याची मागणी केली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!