सुप्रिया सुळेचे व्याही भाजपाचे उमेदवार?

राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांचे व्याही ठरणारे अरुण लखानी भाजपाचे उमेदवार?
चंद्रपूर-गडचिरोली- वर्धा विधान परिषदेसाठी राजकीय चर्चांना उधाण




चंद्रपूर | प्रतिनिधी
आगामी चंद्रपूर-गडचिरोली- वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारीसाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या असून, भाजपाचे प्रदेश सह-कोषाध्यक्ष अरुण लखानी यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी होऊ घातलेल्या कौटुंबिक नात्यामुळे या चर्चेला अधिकच राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांचा विवाह निश्चित झाला असून, अद्याप विवाह सोहळा पार पडलेला नाही. मात्र या आगामी नातेसंबंधामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
नुकतेच सुप्रिया सुळे यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आपल्या कन्येच्या विवाहाचे निमंत्रण दिले होते. यावेळी रेवती सुळे आणि सारंग लखानी हे देखील उपस्थित होते. या भेटीनंतरच भाजपकडून विधान परिषदेसाठी अरुण लखानी यांच्या नावाची चर्चा अधिक वेगाने पुढे येऊ लागल्याचे बोलले जात आहे.
अरुण लखानी हे भाजपाचे प्रदेश सह-कोषाध्यक्ष असून विदर्भातील उद्योग, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा प्रभाव मानला जातो. पक्ष संघटन आणि आर्थिक नियोजनात सक्रिय भूमिका बजावणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजप “लखानी कार्ड” खेळण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, चंद्रपूर-गडचिरोली- वर्धा या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या पट्ट्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत भाजपकडून अरुण लखानी यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होते का, याकडे आता संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!