सावली तहसीलदारांचा मनमानी कारभार - बदली करण्याची नागरिकांची मागणी

 

सावली (विजय कोरेवार )

तालुक्यात तहसीलदार हे पद म्हणजे अतिमहत्वाचे पद कारण तालुक्यातील सर्व भु संपत्तीचा थोडक्यात सांगायचे झाले तर जळी, स्थळी, काष्ठी पाषाणी म्हणजे सर्वदूर असणाऱ्या मालमत्तेचे अधिकार घेऊन बसलेले अधिकारी असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. तालुक्यात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी म्हणून जनतेला न्याय देण्याचा अधिकार बहाल असलेला अधिकारी. परंतु कितीही मोठा पद असला तरी जनतेचा सेवक म्हणूनच काम करावा लागत असतांना मात्र आपल्या पदाच्या गुर्मीत जनतेची सेवा करण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी जनतेला वेठीस धरण्याचे काम सावलीचे तहसीलदार प्रांजली चिरडे करीत असल्याचा अनुभव तालुक्यात येत आहे. मात्र रेती, मुरूम या गौण खनिजसाठी तस्करांना खुली सूट दिली असून या माध्यमातून कोट्यावधीची माया तहसीलदार चिरडे यांनी जमविली असल्याची चर्चा आहे.

       'जो देईल दाम, त्याचेच होईल काम' अश्या पध्दतीने सावली तहसील कार्यालयात कामकाज सुरु असून ज्यांचा कागदावर वजन आहे ती कागदपत्रे खरी की खोटी, योग्य की अयोग्य हे न पहाताच सह्या केल्या जातात मात्र ज्या कागदावर वजन नसेल अशांना कागदपत्रांची पूर्तता केली असल्यावरही मुद्दामहून त्रुटी काढून जनतेला वेठीस धरण्याचे काम खुद्द तहसीलदार करीत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

🚜 शेताची धुरे काम करणाऱ्या शेतातील ट्रॅक्टर जप्त.. कानउघडणी नंतर ट्रॅक्टर सोडले..

अंतरगाव येथील एक शेतकरी ट्रॅक्टरद्वारे आपल्या स्वतःच्या शेतातील पाळे करीत दुरुस्ती करीत असतांना निफंद्रा येथील तलाठी गाडे यांनी अटकाव करीत दोन ट्रॅक्टर जप्त केले. मात्र या कारवाईमुळे गावकरी संतप्त झाले. शेतकऱ्यांनी गावातील लोकांसह आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांची भेट घेऊन तहसीलदार व तलाठी यांच्या कारणांम्याची कैपीयत मांडली. आमदारांनी लगेच फोनवर तहसीलदार चिरडे यांची चांगलीच कानउघाडनी केली. त्यानंतर जप्त ट्रॅक्टर विना अट सोडले. मात्र आमदारांकडे तक्रार करणाऱ्यावर बरसून बदला घेण्याची संधीही तहसीलदार सोडल्या नाही. अंतरगाव येथील तलाठी यांच्या हद्दीत निफंद्रा येथील तलाठी श्री. गाडे येऊन कारवाई करीत असल्याने हा तलाठी तहसीलदारांच्या खास मर्जीतील व वसुली करून देणारा असल्याची चर्चा जनतेमध्ये आहे.

🤝 सहकारी कर्मचाऱ्यांशी अपमानास्पद वागणूक..

कार्यालयातील सहकारी यांना सोबत घेऊन काम करणारा अधिकारी सफल होत असतात मात्र तहसीलदार चिरडे या सहकारी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही वेठीस धरुन थोड्या, थोड्या विषयावर कार्यालयात सर्वांसमोर वाद घालतांना दिसून येत आहे. प्रजासत्ताक दिनी सभागृहात नास्तासाठी निमंत्रकांना बसविण्यात आले. त्यावेळी नायब तहसीलदारांना दुय्यम वागणूक देत आपल्या कुटुंबियांना सोबत बसविले हे अनेकांना पटले नव्हते. एकंदरीत तहसीलदारांच्या कामकाजावर सहकारी अधिकारी, कर्मचारी नाराजी व्यक्त करीत असतांना दिसत आहेत.

👨‍🎓 नामांकित वकिलास चालते व्हा म्हणत अपमानित करण्याचा प्रयत्न...

एका प्रकरणात मुलचे नामांकित वकील आपल्या पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी तहसीलदार यांचे कक्षात दाखल झाले व कायद्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र तहसीलदार चिरडे यांनी पदाचा गैरवापर करीत त्यांना येथून चालते व्हा म्हणत अपमान केला. त्यांनी याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

📄 नागरिकांच्या सनद ची ऐसीतैसी ...

कोणतेही काम वेळेत व्हावे याकरिता नागरिकांची सनद आहे. यात कामाची मर्यादा ठरवून दिलेली आहे मात्र सावलीचे तहसीलदार आपल्या पदाचा दुरुपयोग करुन मनमानी कारभार 

करीत असल्याचे दिसून येते. सातबारा दुरुस्तीची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत, शेतातील रस्त्याच्या वादाचे प्रकरणे, निराधार, विधवा महिलांच्या मंजूर प्रकरणात त्यांना अनुदान दिले जात नाही, निराधार प्रकरणात अनेक वृद्ध निराधार अनुदानाची वाट बघत मयत झाले मात्र अनुदान मिळाले नाही. सरकारी काम आणि वर्षभर थांब अशी प्रचिती नागरिकांना येत आहे.

💰 सत्ताधारी पक्षाच्या नेत्यास उद्धट बोलण्याची हिम्मत..

 वर्षभरापूर्वी अंतरगाव घाटावरून रेती तस्करी सुरु असतांना पाथरीच्या जंगल भागात रेती वाहतूक करतांना एक ट्रॅक्टर रात्रौच्या सुमारास सावलीच्या तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी रोखले व ट्रॅक्टरची चावी व ड्रायव्हर, मजुरांचे मोबाईल घेऊन गेल्या. ट्रॅक्टर रस्त्याचे मधोमध उभी असल्याने त्या मार्गाने रेती तस्करी करणारे ट्रॅकच्या रांगा लागल्या. या बाबत तहसीलदार यांना माहिती देण्यात आली मात्र ट्रकांवरही कारवाई करण्याची हिम्मत नसल्याने त्या फिरकल्याच नाही. शेवटी ट्रकवाल्यानी ट्रॅक्टरला डायरेक्ट करून पहाटेच्या सुमारास ट्रका काढल्या. रात्रभर ट्रका व ट्रॅक्टर रेती भरून असतांना सावली प्रशासनाने कोणतीच कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त झाले होते. ज्या ट्रॅक्टरची चावी तहसीलदार यांनी जप्त करून ठेवले होते ती चावीही व मोबाईल सन्मानाने परत दिल्याने तहसीलदार यांच्या अर्थव्यवहाराची चर्चाही झाली होती. या रात्रभर चाललेल्या घटनाक्रमाबाबत ब्रम्हपुरी क्षेत्रातील सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याने तहसीलदार यांना ट्रॅक्टर सोडण्याच्या सूचना दिल्या मात्र "मी तुम्हाला ओळखत नाही" अशा तहसीलदार यांच्या उद्धट बोलणे या नेत्याच्या जिव्हारी लागले. त्यांनी महसूलमंत्री बावनकुळे यांचेकडे तहसीलदार यांच्या कारणाम्याची माहिती दिली. त्यांनी या बाबीची दखल घेत जिल्हाधिकारी यांना कारवाईचे आदेश दिले. जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली मात्र त्यानंतर चर्चा थांबली.

           सावलीतील तहसीलदारांच्या मनमानीचा वाईट अनुभव अनेकांना येत असल्याने त्यांची बदली करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!