सिलिंडर बुकिंगची २५ दिवसांची मर्यादा पूर्ववत करा; मोतीलाल टहलियानी यांची आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी
गॅस सिलिंडर बुकिंगची २५ दिवसांची मर्यादा पूर्ववत करा; मोतीलाल टहलियानी यांची आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी
मूल (प्रतिनिधी):
आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलिंडरच्या बुकिंग मर्यादेत करण्यात आलेला बदल आता रद्द करून, ती पुन्हा २५ दिवसांवर आणण्यात यावी, अशी मागणी मूल नगर परिषदेचे नगरसेवक मोतीलाल टहलियानी यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
काही काळापूर्वी जागतिक परिस्थितीचे कारण देत सिलिंडर बुकिंगचा कालावधी २५ दिवसांवरून ४५ दिवस करण्यात आला होता. या वाढीव कालावधीमुळे सामान्य ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता आणि वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याने सर्वसामान्यांचे हाल होत होते.
या निवेदनात टहलियानी यांनी नमूद केले की, "आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मूल शहरात आता सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध झाला असून परिस्थिती पूर्णपणे सामान्य झाली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पूर्वीप्रमाणेच २५ दिवसांनंतर सिलिंडर बुकिंग घेण्याची सुविधा पुन्हा सुरू करावी."
सध्याची स्थिती पूर्वपदावर आली असल्याने सामान्य ग्राहकांचा नाहक त्रास थांबवावा, यासाठी आमदार मुनगंटीवार यांनी माननीय पेट्रोलियम मंत्री यांच्याशी चर्चा करून यावर तातडीने निर्णय घेण्यास सहकार्य करावे, अशी विनंतीही मोतीलाल टहलियानी यांनी यावेळी केली आहे. या मागणीमुळे मूल शहरातील हजारो गॅस ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!