कुमुदिनी भोयर : जिद्द, संवेदनशीलता आणि नेतृत्वाची प्रेरणादायी कहाणी
कुमुदिनी भोयर : जिद्द, संवेदनशीलता आणि नेतृत्वाची प्रेरणादायी कहाणी
मुल तालुक्यातील पहिली महिला पत्रकार म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या कुमुदिनी भोयर या केवळ पत्रकारितेतच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही आपला ठसा उमटवणाऱ्या एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी आपल्या कार्यातून महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा आदर्श घालून दिला आहे.
कुमुदिनी यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून “स्त्रीशक्ती ग्रुप” तयार करून शहरातील व परिसरातील प्रतिष्ठित आणि कर्तृत्ववान महिलांना एकत्र आणले. या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी महिलांची एक मजबूत संघटित शक्ती उभी केली आहे. महिलांच्या समस्या, अन्याय आणि हक्कांसाठी त्या या शक्तीचा प्रभावीपणे वापर करत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक महिलांना आवाज मिळाला आणि एकजूट निर्माण झाली.
कुमुदिनी भोयर या प्रेस क्लब, मुलच्या स्थापनेपासून सचिव म्हणून कार्यरत आहेत. सचिव या नात्याने त्यांनी सर्व पत्रकारांना एकत्रित ठेवत, संघटितपणे आणि समन्वयाने काम करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे प्रेस क्लबची कार्यक्षमता वाढली असून, पत्रकारांमध्ये एकोपा आणि सहकार्याची भावना दृढ झाली आहे.
कोरोनाच्या कठीण काळात कुमुदिनी यांच्या संवेदनशीलतेची खरी परीक्षा झाली. आईला कोरोना झाल्यानंतर तिची सेवा करताना त्यांनाही संसर्ग झाला. मात्र क्वारंटाईन सेंटरमध्ये असतानाही त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत इतर कोरोनाग्रस्त रुग्णांचीही सेवा केली, त्यांना मानसिक आधार दिला आणि मदतीचा हात पुढे केला. ही त्यांची माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारी घटना आहे.
मूल शहरातील “प्रेम कामडी हत्या प्रकरणा”त न्याय मिळावा यासाठी त्यांनी आयोजित केलेली मेणबत्ती रॅली विशेष उल्लेखनीय ठरली. या रॅलीचे यशस्वी आयोजन करून त्यांनी समाजात न्यायासाठी आवाज उठवण्याची ताकद दाखवून दिली.
शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांची वाटचाल प्रेरणादायी आहे. संगीत विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत असतानाच, त्या सध्या शिक्षणशास्त्रातील पदवी (B.Ed.) घेत आहेत. शिक्षणासोबतच सामाजिक व सांस्कृतिक कार्य आणि घरची जबाबदारी समर्थपणे सांभाळणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष वैशिष्ट्य आहे.
यासोबतच, आपल्या वाढदिवसाचा आनंद इतरांसोबत वाटण्याची त्यांची अनोखी परंपरा आहे. दरवर्षी वाढदिवसानिमित्त त्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन रुग्णांना फळांचे वाटप करतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपला दिवस साजरा करतात. समाजाप्रती असलेली त्यांची ही संवेदनशीलता आणि सेवाभाव विशेष कौतुकास्पद आहे.
सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कुमुदिनी यांचा नेहमीच उत्स्फूर्त सहभाग असतो. कोणतेही कार्य असो, त्या नेहमी पुढाकार घेऊन ते यशस्वीपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि कार्यतत्परतेमुळे त्या समाजात एक आदर्श व्यक्तिमत्त्व बनल्या आहेत.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या या उल्लेखनीय कार्याला सलाम करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळत राहो, हीच सदिच्छा.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!