चिमूर शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा बोजवारा
स्त्री-पुरुष मुत्रीघरांच्या अभावामुळे नागरिक त्रस्त; नगर परिषद व लोकप्रतिनिधी विरोधात संताप
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात आजही सार्वजनिक स्त्री-पुरुष मुत्रीघरांची कोणतीही सक्षम व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठ, बसस्थानक परिसर, मुख्य चौक तसेच गर्दीच्या ठिकाणी स्वच्छ व सुरक्षित सार्वजनिक मुत्रीघर नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
चिमूर नगर परिषद क्षेत्रात अनेक वर्षांपासून सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र नगर परिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष तसेच नगरसेवक यांचे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहराच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असल्या तरी नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित स्वच्छतागृह नसल्याने महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा नागरिकांना उघड्यावर लघुशंका करावी लागत असल्याने स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर बनत असून आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्थानिक आमदारांनी देखील या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन निधी उपलब्ध करून शहरात अत्याधुनिक सार्वजनिक स्त्री-पुरुष मुत्रीघर उभारावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरोधात जनतेत तीव्र नाराजी पसरत असून लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!