पवनी एस.टी.गेट समोर बस स्टॉप आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा करा
नागरिकांचे आगार व्यवस्थापकांना निवेदन
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.२४/०५/२०२६ पवनी शहरातील एस.टी.डेपोच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर प्रवाशांसाठी डिजिटल छोटा बस स्टॉप उभारण्यात यावा तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी पवनी तालुक्यातील नागरिकांनी आगार व्यवस्थापकांना लेखी निवेदन सादर केले आहे. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिक, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
नागरिकांचे हाल; अपघाताचा धोका वाढला
पवनी येथील एस.टी.गेट समोर दररोज शेकडो प्रवासी बसची प्रतीक्षा करत उभे राहत असतात. मात्र, या ठिकाणी प्रवाशांसाठी सावलीची कोणतीही व्यवस्था नाही. बसण्यासाठी बाकडे किंवा शेड नसल्यामुळे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यातही नागरिकांना रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची वाट पाहावी लागते. त्यामुळे महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचे विशेष हाल होत आहेत.
याशिवाय, मुख्य रस्त्यावर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता या परिसरात केव्हाही मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
निधीच्या माध्यमातून काम तातडीने मार्गी लावा
नागरिकांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हा डिजिटल छोटा बस स्टॉप आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा सहज उपलब्ध करून देता येऊ शकते. यासाठी आमदार निधी, खासदार निधी, नगर परिषद निधी अथवा नगराध्यक्ष निधीचा वापर करण्यात यावा. आगार व्यवस्थापकांनी स्वतः या जागेची पाहणी करून संबंधित विभागांशी समन्वय साधत हे काम तातडीने मंजूर करून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
“प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष न करता तात्काळ पावले उचलावीत, अन्यथा नागरिकांचा असंतोष वाढेल.”
— समस्त पवनी तालुका नागरिक
निवेदन देताना धनराज उपरीकर, संजय पुरी वैकुंठे, गोलू कहु, महादेव लिचडे, प्रशांत उरकुडकर, अमोल बानाईत, अंकुश देशमुख यांच्यासह पवनी तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते. आता या निवेदनावर आगार व्यवस्थापन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण पवनीकरांचे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!