राज्यातील हजारो शिक्षकांना मोठा लाभ; पण आधी करावे लागणार ‘हे’ महत्त्वाचे काम

राज्यातील अनुदानित खासगी शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ABHA कार्ड सक्तीचे


शिक्षण संचालकालयाचे आदेश; आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळविण्यासाठी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन
पुणे : राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत “आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA)” कार्ड काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंदर्भात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकालयाने २२ मे २०२६ रोजी आदेश जारी केले आहेत.
शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक तसेच वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकांना याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांचा या योजनेंतर्गत समावेश करण्यात येणार आहे.
शासनाच्या माहितीनुसार, आयुष्मान भारत योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरवर्षी कुटुंबामागे ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षणाचा लाभ मिळतो. या योजनेत महात्मा फुले जन आरोग्य योजनेचाही समावेश असून राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा मिळणार आहे.
संचालकालयाने स्पष्ट केले आहे की, ABHA कार्ड तयार केल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहणार असून उपचार प्रक्रियेत सुलभता येईल. तसेच भविष्यातील आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड महत्त्वाचे ठरणार आहे.
यासोबतच ABHA कार्ड काढण्याची कार्यपद्धती व व्हिडिओ लिंकही संबंधित कार्यालयांना पाठविण्यात आली आहे. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तातडीने नोंदणी करून कार्ड तयार करून घ्यावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षक व कर्मचाऱ्यांना मोठा वैद्यकीय आधार मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!