मूलच्या मधु पेंटर चा धक्कादायक इतिहास : थेट शिवाजीशी नाते
पांढरी दाढी, बारीक शरीरयष्टी, अत्यंत साधा विस्कटलेला पेहराव, आवाजात मधुरपणा, हातात रंगाची जादू, या जादूने दुकानावर, दुकानाच्या बोर्डावर भिंतीवर निळ्या पिवळ्या रेघोट्या ओढून दुकानाचे फलक बनवणारा मूलचा फकीर वाटणारा मधुकर पेंटर आठवतो काय? आठवत नसेल तर फोटो पहा.. मधुकर पॉलीकर.. मात्र लोक त्याला मधु पेटर म्हणूनच ओळखायचे.. अलीकडेच त्याच्या मुलाने, म्हणजे ॲड. अश्विन पॉलिकर यांनी आपल्या "कुळा" चा शोध घेतला, आणि त्यालाही आश्चर्य झाले, मूल शहरात जगण्यासाठी संघर्ष करणारा मधु पेंटर आणि ॲड. अश्विन पॉलीकर यांची नाळ थेट शिवाजी महाराजांची जुळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाची असलेली, ही कुळ कथा अश्विन यांनी पब्लिक पंचनामाला उलगडून दाखविली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू सरदार नेताजी पालकर यांच्या खानदानीतील असलेले आणि नंतर काही कारणाने पॉलिकर झालेले, हे घराणे मूलच्या मातीत रुजले वाढले हे अनेकांना आश्चर्य वाटत असेल तरी हाच खरा इतिहास आहे.
उदरनिर्वाह करीता पेंटरकी करणारा, विहीरगांवच्या झोपडीत राहणारा मधुकर पॉलीकर, मुलगा अश्विन पॉलीकर याला तो, 'आपण शोभाताईच्या (फडणवीस) जातीतले आहोत, आपले पूर्वज कोकणातून नागपूरकडे आले.” असे नेहमी सांगायचे. लहानग्या अश्विनला मात्र त्यात काही वेगळे वाटत नव्हते. फकीर म्हणूनच मृत्यु पावलेल्या मधुकर पॉलीकर याचा मुलगा पुढे मोठा झाला, वकिल झाला, मूलच्या प्रतिष्ठीत समाजातील घटक झाल्यानंतर, त्याला आपले पॉलीकर आडनावाचे अधिक लोक का नाहीत? हा प्रश्न घर करू लागला व त्याला आपल्या वडिलांचे बोल आठवू लागले. लागलीच त्यांनी, आपल्या कुळाचा शोध घेण्याकरीता, गुगल, अेआय ची मदत घेतली आणि आपले घराण्याचा शोध लागल्यांने, त्यातही त्याचे घराणे थेट रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांचेशी जुळल्यांचे त्याच्या आश्चर्याचा पारावर उरला नाही.
असा शोधला घराण्याचा 'कुळ'
गुगल सर्च, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) माध्यमातून मिळालेली माहिती, इतिहासातील संदर्भ, तसेच स्थानिक परंपरा यांचा अभ्यास करत असताना या नावांची नाळ पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील नेताजी पालकर Netaji Palkar यांच्या घराण्याशी जोडली जात असल्याचे संकेत मिळू लागले.
अश्विन यांनी नेताजी पालकर चे थेट शिरूर गाठून तेथील पुजाऱ्याकडून, ग्रंथ पोथीचे अवलोकन करून, आपण त्याच कुळातील असल्याची खात्री करून घेतली.
शिरूर परिसरात चौकशी करण्यात आली. स्थानिक मंदिर संस्थानांमध्ये जतन केलेल्या वंशावळी, कुळांची नोंद आणि स्थलांतराच्या उल्लेखांचा अभ्यास करण्यात आला. त्या नोंदींमध्ये “पालकर” या आडनावाचं पुढे “पालेकर” आणि नंतर “पॉलीकर” असं रूपांतर झाल्याचे उल्लेख आढळल्याचे सांगितले जाते.
यामुळे “पॉलीकर” हे मूळ “पालकर” घराण्याचंच पुढील रूप असावं, अशी ऐतिहासिक साखळी अधिक स्पष्ट होत गेली.
नागपूर भोसले दरबाराशी जोडलेला धागा
इतिहासाचा आणखी एक महत्त्वाचा धागा नागपूरच्या भोसले दरबाराशी जोडला जातो. स्थानिक परंपरांनुसार, मुधोजी भोसले Mudhoji Bhonsle यांच्या काळात, सुमारे इ.स. १८१७ च्या आसपास, या घराण्यातील पूर्वजांना दरबारात वकील म्हणून आणण्यात आल्याचा उल्लेख आढळतो.
त्यानंतर हे कुटुंब नागपूर परिसरात स्थायिक झालं. पुढे मधुकर पिराजी पोलीकर हे इ.स. १९६८ मध्ये मुल येथे स्थायिक झाले आणि तेव्हापासून हे कुटुंब मुल शहराशी कायमचं जोडले गेलं.
पालकर ते पोलीकर : नाव बदललं, पण वारसा कायम राहिला
काळाच्या ओघात सामाजिक, राजकीय आणि धार्मिक परिस्थितींमुळे अनेक घराण्यांमध्ये बदल झाले. स्थानिक परंपरांनुसार, पालकर घराण्यातील काही सदस्यांनी पुढे ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि त्यानंतर “पालकर” या आडनावाचे “पॉलीकर” किंवा “पोलीकर” असे रूपांतर झाले.
इतिहासातील अनेक उदाहरणांप्रमाणे, इंग्रजकालीन लेखनपद्धती, उच्चारातील बदल आणि प्रशासनातील नोंदींमुळे आडनावांची रूपे बदलत गेली. “पालकर” पासून “पालेकर” आणि पुढे “पॉलीकर” असा प्रवास झाल्याची माहिती स्थानिक परंपरा, वंशावळीच्या नोंदी आणि अभ्यासकांच्या उल्लेखांतून समोर येते.
पोलीकर घराण्याच्या तीन पिढ्या विशेषत्वाने उल्लेखनीय ठरतात :
नंदाजी येसाजी पोलीकर
पिराजी नंदाजी पोलीकर
मधुकर पिराजी पोलीकर
या तिन्ही पिढ्यांनी मोलमजुरी, श्रम, प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान यांच्या आधारावर आयुष्य घडवलं.
घरात मोठी संपत्ती नव्हती; पण माणुसकीचा ठेवा मोठा होता. गावात एखादा गरजू माणूस दिसला तर मदतीचा हात पुढे करणे, साधेपणाने जगणे आणि कष्टाला प्रतिष्ठा देणे — हीच या घराण्याची खरी ओळख बनली.
छत्रपती शिवाजीच्या लेकीचा विवाह पालकरांशी
छत्रपती शिवाजी महाराज यांची मुलगी कमळाबाई, हिचा विवाह नेताजी पालेकर याचा मुलगा जानोजी पालकर यांना दिली घराण्यात झाल्याची इतिहासात नोंद आहे. यामुळे आपले नाते थेट छत्रपती शिवाजी महाराज यांचेशी जुळले असल्याचा अभिमान अॅड. अश्विन पॉलीकर यांना आहे.
कोण आहे नेताजी पालकर
नेताजी पालकर हे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांचे अत्यंत पराक्रमी सरसेनापती होते. त्यांना “प्रतिशिवाजी” असेही म्हटले जात असे. त्यांनी स्वराज्य स्थापनेच्या काळात अनेक लढायांमध्ये मोठे योगदान दिले.
त्यांचा जन्म रायगड परिसरातील पालकर घराण्यात झाला होता. इ.स. १६५७ मध्ये त्यांची सरसेनापतीपदी नियुक्ती झाली. अफजलखान वधानंतर आदिलशाहीविरुद्धच्या मोहिमांमध्ये त्यांनी मोठा पराक्रम गाजवला.
नंतर मुघलांनी त्यांना पकडले आणि औरंगजेबाने त्यांचे धर्मांतर करून त्यांना “मोहम्मद कुली खान” हे नाव दिले. मात्र काही वर्षांनी ते पुन्हा स्वराज्यात परतले आणि हिंदू धर्म स्वीकारला. शिवाजी महाराजांनी त्यांचे पुन्हा सन्मानाने स्वागत केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!