धानोली येथे अंदाजे २० ब्रास अवैध रेतीसाठा जप्त

मोठ्या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले; घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती देण्याची शक्यता

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा तालुक्यातील धानोली नदीकाठ परिसरात महसूल विभागाने मोठी कारवाई करत अंदाजे २० ब्रास अवैध रेतीसाठा जप्त केला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले असून परिसरात आणखीही अनेक ठिकाणी अशा प्रकारचे अवैध रेतीसाठे असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. २८ मे २०२६ रोजी धानोली नदीकाठावर चार वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेतीसाठा आढळून आला. सदर रेतीसाठा कोणाच्या मालकीचा आहे याबाबत गावातील पोलीस पाटील यांनी चौकशी केली. मात्र तब्बल दोन ते तीन तास उलटूनही कुणीही संबंधित रेतीसाठ्यावर मालकी हक्क सांगितला नाही.

यानंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून अंदाजे २० ब्रास अवैध रेतीसाठा जप्त केला. या कारवाईमुळे अवैध रेती तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून महसूल विभाग आणखी काही ठिकाणी कारवाई करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठांच्या आदेशानुसार जप्त करण्यात आलेली रेती धानोली ग्रामपंचायत हद्दीतील घरकुल लाभार्थ्यांना मोफत वितरण करण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे गरीब व गरजू लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वरोरा तालुक्यातील शेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर घरकुल मंजूर झाले आहेत. मात्र घरबांधणीसाठी लागणारी रेती तुराणा घाटावरून आणावी लागत असल्याने लाभार्थ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शेवटच्या टोकावरील गावांपासून तुराणा घाटाचे अंतर ३० किलोमीटरपेक्षा अधिक असल्याने रेती वाहतुकीसाठी तब्बल १० ते १२ हजार रुपये खर्च येत असल्याची माहिती समोर आली आहे.

या वाढत्या खर्चामुळे अनेक घरकुल लाभार्थी नाईलाजास्तव अवैध रेती तस्करांकडून सहा ते सात हजार रुपये प्रति ट्रॅक्टर दराने रेती खरेदी करून बांधकाम करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा महसूल प्रशासनाने गावाशेजारील नाले व नदीपात्रातून नियमबद्ध पद्धतीने रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी घरकुल लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, धानोली येथील कारवाई ही केवळ सुरुवात असून प्रशासनाने सातत्याने मोहिम राबविल्यास तालुक्यातील अवैध रेती तस्करीवर मोठ्या प्रमाणात आळा बसू शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!