चिमूर तहसील कार्यालयाच्या आवारातच अवैधरित्या टाकली जात आहे चोरीची वाळू
महसूल विभाग व ग्राम महसूल पथक कारवाई करेल काय?
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात मोठ्या प्रमाणावर उमा नदी पात्रातून दिवस-रात्र अवैधरित्या वाळू उपसा करून ती शासकीय तसेच खाजगी बांधकामांवर सर्रासपणे टाकली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अनेक ट्रॅक्टर हे विना नंबरचे असल्याने अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाडस वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई मार्गावरील दुभाजकांवर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये दैनंदिन वाहतुकीचे तसेच विविध घटनांचे चित्रीकरण होत असते. शांतता भंग होऊ नये, गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण राहावे तसेच तपासासाठी मदत व्हावी या उद्देशाने बसविण्यात आलेल्या या कॅमेऱ्यांसमोरूनच खुलेआम वाळू वाहतूक होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
धक्कादायक बाब म्हणजे चिमूर तहसील कार्यालयाच्या आवारातच चोरीची वाळू टाकली जात असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तहसील कार्यालय परिसरातच अशा प्रकारे अवैध वाळू साठवण होत असेल तर महसूल विभाग आणि ग्राम महसूल पथक नेमकी कोणावर कारवाई करणार, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत.
उमा नदी पात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असून शासनाला लाखो रुपयांचा महसुली तोटा सहन करावा लागत आहे. तरीसुद्धा संबंधित विभागाकडून कठोर कारवाई होत नसल्यामुळे वाळू माफियांचे मनोबल वाढत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी महसूल विभाग, ग्राम महसूल पथक तसेच पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कठोर कारवाई करावी, विना नंबर वाहनांची तपासणी करावी तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे.
आता चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी यांनी अवैध धंध्यावर आढा सराईत गुन्हेगारांवर कारवाई याचा अवलंबलेला मार्ग दैनंदिन होणाऱ्या कारवाईला बघता चिमूर येथील पोलीस निरीक्षकांना कारवाईस अवगत करावे आणि वन व महसूल विभाग तसेच पोलीस प्रशासन या गंभीर प्रकाराची दखल घेऊन कारवाई करणार का, याकडे संपूर्ण चिमूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!