मालधक्का -आयरन खनिज वाहतुकीमुळे मत्स्य व्यवसाय धोक्यात; शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ
मूलक शहरातील ऐतिहासिक तलावावर संकट: आयरन खनिज वाहतुकीमुळे मासेमार व संस्कृती धोक्यात
मूल शहरातील ढिवर समाजावर उपासमारीचे भीषण संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयरन खनिज वाहतुकीसाठी प्रस्तावित मालधक्का प्रकल्पामुळे केवळ तलावाचे पर्यावरणच नव्हे, तर शेकडो मासेमार कुटुंबांचा उदरनिर्वाह आणि शहराची सांस्कृतिक परंपराही धोक्यात आली आहे.
मूल शहराच्या हृदयस्थानी असलेला विशाल तलाव हा केवळ नैसर्गिक सौंदर्याचा केंद्रबिंदू नसून, शहराच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाचा आधारस्तंभ आहे. बसस्थानकाच्या शेजारी आणि गडचिरोली महामार्गालगत वसलेला हा तलाव शहराची ओळख मानला जातो.
या तलावावर मूल शहरातील ढिवर समाजाचा पारंपारिक मासेमारी व्यवसाय अवलंबून आहे. मत्स्यपालन सोसायटीमार्फत तलावातील मासेमारीचे हक्क दिले गेले असून, यावर अनेक मासेमार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा व्यवसाय आता संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मूल शहरात आयरन खनिज वाहतुकीसाठी मालधक्का सुरू करण्याबाबत निवेदन दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रस्तावामुळे स्थानिक ढिवर समाजात मोठी चिंता व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या मते, मालधक्का सुरू झाल्यास तलावाच्या काठाने मोठ्या प्रमाणावर आयरन खनिजाने भरलेले हायवा ट्रक वाहतूक करतील. या वाहतुकीदरम्यान खनिजाचा लाल खनिज व धूळ तलावात मिसळण्याची शक्यता आहे. परिणामी, तलावाचे पाणी प्रदूषित होऊन संपूर्ण तलाव “लाल” होण्याचा धोका निर्माण होईल. याचा थेट परिणाम मत्स्य उत्पादनावर होऊन मासेमारी पूर्णपणे ठप्प होण्याची भीती आहे.
यामुळे शेकडो मासेमार कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
फक्त आर्थिकच नव्हे, तर हा तलाव मूल शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचाही अविभाज्य भाग आहे. अनेक वर्षांपासून येथे गणेश विसर्जन, दुर्गा विसर्जन, शारदा विसर्जन आणि गौरी विसर्जन यांसारखे प्रमुख उत्सव साजरे केले जातात. तलाव प्रदूषित झाल्यास या परंपरांनाही मोठा धोका निर्माण होणार आहे.
स्थानिक नागरिक, मासेमार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाने या प्रस्तावाचा पुनर्विचार करून पर्यावरण आणि स्थानिकांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे.
एकीकडे विकासाचे दावे, तर दुसरीकडे पर्यावरण आणि परंपरेवर घोंगावणारे संकट — मूल शहरासाठी हा निर्णायक टप्पा ठरणार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!