मुल शहरात मालधक्का करा; माजी मंत्री शोभाताई फडणवीस, पांडुरंग आंबटकर यांची मागणी — मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

मुल शहरात मालधक्का करा; माजी मंत्री शोभाताई फडणवीस, पांडुरंग आंबटकर यांची मागणी — मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन


चंद्रपूर : वाघांच्या वाढत्या दहशतीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच मुल शहरातील प्रस्तावित मालधक्का प्रकल्प रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, या मागण्यांसाठी माजी मंत्री शोभाताई फडणवीस आणि महाराष्ट्र शिक्षक प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग आंबटकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या संकलित करण्यात आल्या असून, “आम्ही वाघाचे खाद्य आहोत का?” असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेली भीती, असुरक्षितता आणि नागरिकांच्या जीविताचा प्रश्न गंभीर बनला असून, यावर तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना जंगललगतच्या भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन दररोज धोक्यात असल्याचे नमूद केले. वाघांच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असतानाही प्रशासनाकडून पुरेशी आणि प्रभावी मदत मिळत नसल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली.
तसेच, मुल शहरातील प्रस्तावित मालधक्का प्रकल्प रद्द करण्यामागे मुठभर हिताच्या लोकांचे राजकीय हेतू असल्याचा आरोप करत, या निर्णयाचा पुनर्विचार करून प्रकल्प पुन्हा सुरू करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. हा प्रकल्प स्थानिक विकासासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वाचा असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.
याशिवाय, उद्योगांना विरोध करून विकास रोखणे आणि त्याचा फटका स्थानिकांना बसणे हे अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तेंदूपत्ता संकलनासारख्या पारंपरिक रोजगारावरही वाघांच्या भीतीचा परिणाम होत असल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान होत असल्याची बाबही समोर आणण्यात आली.
दरम्यान, या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक भूमिका घेतील, असा विश्वास शोभाताई फडणवीस आणि पांडुरंग आंबटकर यांनी व्यक्त केला आहे.

1 टिप्पणी:

झिंदाबाद!