महिला खासदारांचा ‘महिला आरक्षणालाच’ धक्का!” धानोरकरांच्या विधानाने संतापाचा स्फोट, काँग्रेस अडचणीत
महिला खासदारांचा ‘महिला आरक्षणालाच’ धक्का!” धानोरकरांच्या विधानाने संतापाचा स्फोट, काँग्रेस अडचणीत
चंद्रपूर : देशभरात महिलांच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ विधेयकावर संसदेत चर्चा सुरू असताना, चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कथित विधानाने राजकीय व सामाजिक पातळीवर प्रचंड खळबळ उडाली आहे. “महिलांना आरक्षणाची गरजच नाही” असे वक्तव्य करत त्यांनी थेट महिलांच्या हक्कांनाच धक्का दिल्याचा आरोप केला जात आहे.
या विधानानंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, महिला संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. “संघर्ष करून पुढे येणाऱ्या हजारो महिलांच्या प्रयत्नांचा अपमान झाला,” अशा शब्दांत प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी हे वक्तव्य “असंवेदनशील आणि महिलांविरोधी” असल्याची टीका केली आहे.
राजकीय पातळीवरही हा मुद्दा तापला असून, काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आणि धानोरकर यांचे विधान यामध्ये स्पष्ट विसंगती दिसत असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाला पाठिंबा दिलेला असताना, त्याच पक्षाच्या खासदारांकडून याच्या विरोधात सूर उमटल्याने पक्ष अडचणीत सापडल्याची चर्चा रंगली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसमधील काही महिला पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे तक्रार केली असून, धानोरकर यांच्यावर कारवाईची मागणीही पुढे येत आहे.
दरम्यान, विरोधकांनीही या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. “महिला खासदारच महिलांच्या हक्कांवर प्रश्न उपस्थित करत असतील, तर हा केवळ राजकीय मुद्दा नाही, तर विचारसरणीचा पराभव आहे,” अशी टीका केली जात आहे. एकूणच, धानोरकर यांच्या एका विधानाने “महिला सक्षमीकरण” या संवेदनशील विषयावर मोठा राजकीय वाद पेटला असून, आता काँग्रेस पक्ष यावर काय भूमिका घेणार, याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!