मूल शहरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार? नागरिक त्रस्त, प्रशासनाकडून फक्त आश्वासन

मूल शहरात गॅस सिलेंडरचा काळाबाजार? नागरिक त्रस्त, प्रशासनाकडून फक्त आश्वासन



मूल : शहरात घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि काळाबाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. एजन्सी चालकांकडून अधिक पैसे घेऊन घरपोच सिलेंडर पुरवठा केला जात असून, काही राजकीय नेते आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे वितरण प्रक्रियेत पक्षपात होत असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान आज एका व्हाट्सअप ग्रुप वरून,  मूल शहराचे सामाजिक कार्यकर्ते भास्कर खोब्रागडे यांनी तहसील कार्यालय मुल येथे उद्या आंदोलन करण्याची हाक दिली आहे, नागरिकांनी तहसील कार्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
नागरिकांच्या मते, सामान्य ग्राहकांचे फोन एजन्सीकडून उचलले जात नाहीत, तर काही ठराविक लोकांचे फोन मात्र तत्काळ उचलले जातात. गॅस गाड्या कुठे उभ्या करायच्या, कोणाला प्राधान्याने सिलेंडर द्यायचे याबाबत काही लोकप्रतिनिधींकडून थेट सूचना दिल्या जात असल्याचेही प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, शहरात मोठ्या प्रमाणावर सिलेंडर येऊनही लोकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. विशेष म्हणजे, काही ग्राहकांना ओटीपी मिळूनही 10 ते 15 दिवस नव्हे तर जवळपास महिनाभर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. एका ग्राहकाने सांगितले की, त्यांना 23 मार्च रोजी ओटीपी मिळाला, मात्र महिनाभरानंतरही त्यांना सिलेंडर मिळालेले नाही.
दरम्यान, या प्रकरणी तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी परिस्थितीमध्ये अडचणी असल्याचे मान्य केले असून, लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
मात्र, प्रशासनाच्या आश्वासनांनंतरही नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, गॅस वितरण व्यवस्थेतील गैरप्रकारांवर तातडीने कारवाई करून पारदर्शकता आणावी, अशी मागणी जोर धरत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!