"मूल शहराला 'लाल' करण्याचा डाव; स्वतःच्या कंत्राटासाठी नेत्याकडून जनतेच्या फुफ्फुसांचा व्यापार!"
दररोज लाखोंच्या कमाईसाठी नेत्याचा हट्ट’; मूल शहरात मालधक्का पुन्हा आणण्याचा डाव, रोजगार फक्त आमिष?
मूल (प्रतिनिधी):
ज्या शहराने राजकीय ताकद दिली, ज्या शहराने मोठे केले, त्याच शहराच्या आरोग्याचा सौदा करायला एक लोकप्रतिनिधी सरसावले आहे. स्वतःला दिवसाला लाखो रुपयांची कमाई करून देणारे लोहखनिज वाहतुकीचे कंत्राट मिळावे, या एकमेव हव्यासापोटी मूल शहरात पुन्हा एकदा 'मालधक्का' सुरू करण्याचे कारस्थान रचले जात आहे. विशेष म्हणजे, यासाठी 'वाघांच्या हल्ल्यांचा' असा कोणताही तर्क नसलेला हास्यास्पद आधार घेऊन नागरिकांची दिशाभूल केली जात आहे.
मूल शहरात मालधक्का सुरू करण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींमागे एका स्थानिक राजकीय नेत्याचा मोठा आर्थिक स्वार्थ दडलेला असल्याचा गंभीर आरोप पुढे येत आहे. सुरजागड येथून येणाऱ्या लोहखनिजाच्या वाहतुकीतून दररोज लाखो रुपयांची कमाई करून देणारे कंत्राट मिळवण्यासाठी हा संपूर्ण डाव रचला जात असून, “मोठ्या प्रमाणात रोजगार” हे फक्त नागरिकांना भुलविण्याचे साधन असल्याचे स्पष्ट होत आहे. रोजगार कसा उपलब्ध होईल याबाबत मात्र, ते काहीही बोलत नाहीत.
या योजनेनुसार, सुरजागड येथून लोहखनिज मोठमोठ्या हायवा वाहनांद्वारे मूल शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहतूक करून रेल्वे ट्रॅकवर टाकले जाणार आहे. त्यानंतर या खनिजाची रेल्वे बोग्यांमधून पुढे वाहतूक केली जाणार आहे. मात्र या प्रक्रियेमुळे शहरावर प्रदूषणाचे गंभीर संकट ओढवणार आहे.
लोहखनिजाची लाल धूळ हवेत उडून संपूर्ण परिसर लालसर होण्याचा धोका आहे. या धुळीत असलेल्या घातक आयरन कणांमुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढेल. पिण्याचे पाणी दूषित होईल, शेतीवर परिणाम होईल आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दोन वर्षांपूर्वीही मूल शहरात मालधक्का सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र ‘गुड मॉर्निंग ग्रुप’च्या पुढाकाराने, तसेच सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, शहरातील सर्व व्यावसायिक, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्था यांच्या एकत्रित आंदोलनामुळे हा निर्णय रद्द करण्यात आला होता. त्या वेळी या भागाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हस्तक्षेप करून हा प्रस्ताव थांबवला होता.
यानंतर हा प्रकल्प केळझर गावात हलविण्यात आला. तेथील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, गावाचा सर्वांगीण विकास होईल अशी आश्वासने देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात अत्यल्प रोजगार मिळाला. उलट संपूर्ण गावात लाल धूळ पसरली, शेतीचे मोठे नुकसान झाले, पाणी दूषित झाले आणि अनियंत्रित हायवा वाहतुकीमुळे केळझर आणि सुशी-दाबगाव परिसरातील नागरिकांना अपघातांचा सामना करावा लागला. परिणामी तेथील ग्रामस्थांनीही तीव्र आंदोलन छेडले. ज्या ज्या गावात बळजबरीने आणि खोटे आश्वासन देऊन लोहखनिज साठी मालधक्का तयार करण्यात आला तेथील सर्वांचे अनुभव नकारात्मक असून कोणताही रोजगार मिळाला नसल्याची खंत ते व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मूल शहरात प्रचंड रोजगार मिळणार असे हास्यास्पद दावे स्वतःच्या स्वार्थासाठी केले जात आहे.
अशा नकारात्मक अनुभवांनंतरही पुन्हा मूल शहरात मालधक्का आणण्याचा प्रयत्न होत असल्याने नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. विशेष म्हणजे, या निर्णयासाठी शहरात सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र या निवेदनावर कोणत्याही संघटनेचे नाव, कोणत्याही जबाबदार व्यक्तीची ओळख किंवा नेतृत्वाचा उल्लेख नाही. स्वतःची जबाबदारी टाळत, गुप्तपणे सह्या गोळा केल्या जात असल्याने हा प्रकार अधिकच संशयास्पद ठरत आहे.
या निवेदनातील मजकूरही नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. “चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा असल्याने मालधक्का सुरू करावा” असा अजब आणि विसंगत तर्क मांडण्यात आला आहे. वाघ आणि मालधक्का यांचा संबंध काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, या सर्व हालचालींच्या केंद्रस्थानी असलेला मुद्दा अधिक गंभीर आहे. मूल शहरातील एका राजकीय नेत्याने स्वतःला फायदेशीर कंत्राट मिळावे यासाठी, शहरवासीयांचा तीव्र विरोध असतानाही, राजकीय सत्तेचा वापर करून हा प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. “रोजगार मिळेल” या नावाखाली जनतेसमोर खोटे चित्र उभे केले जात असल्याचा आरोप होत आहे.
शहरात मालधक्का झाल्यास मूल शहरातीलच नव्हे तर तालुक्यातील एकमेव कर्मवीर ग्राउंड या नावाने ओळखले जाणारे मैदान नष्ट होण्याची भीती आहे. मूल शहरात होणारे मोठे कार्यक्रम, सभा, शहरवासीयांना मार्निंग वाॅक करिता, बेरोजगार युवकांना पोलीस भरतीच्या व इतर भरतीच्या मैदानी सरावा करिता, तालुक्यातील सर्व प्रकारचे मोठ्या खेळाकरिता हेच एकमेव मैदान असून, एका राजकीय नेत्याच्या स्वार्थापायी हे मैदान नष्ट होण्याची भीती आहे.
मालधक्का झाल्यास संभाव्य गंभीर परिणाम:
- संपूर्ण शहरात लाल धूळ पसरून वायू प्रदूषणात मोठी वाढ
- ध्वनी प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त
- जलस्रोत दूषित होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
- शेतीचे नुकसान आणि मातीची गुणवत्ता खालावणे
- शहरात वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढणे
- नागरिकांच्या आरोग्यावर दीर्घकालीन घातक परिणाम
- कर्मवीर महाविद्यालयाचे मूलवासीयांचा श्वास असलेले, एकमेव मोठे मैदान नष्ट होण्याची भीती.
केळझरच्या अनुभवातून स्पष्ट झाले आहे की, मालधक्का हा विकासाचा नव्हे तर विनाशाचा मार्ग ठरू शकतो. तरीही पुन्हा तोच प्रयोग मूल शहरावर लादण्याचा प्रयत्न होत असल्याने, नागरिकांनी सजग राहून “रोजगार” या नावाखाली रचल्या जाणाऱ्या या डावाला ठाम विरोध करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



मुल येथे मालधक्का अजिबात करण्यात येवू नये.अन्यथा जबरदस्त आंदोलन करण्यात येईल.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा