घनकचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी जलतरण तलाव; मुख्याधिकाऱ्यांचा मनमानी कारभार उघड

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - भंडारा जिल्ह्यातील पवनी ला विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाते आणि शहरात नगर परिषदेचा भोंगळ कारभार अक्षरशः वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शहरातील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या दुर्गंधीयुक्त परिसरात जलतरण तलावाचे बांधकाम सुरू केल्याने संतप्त नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली आहे.ज्या ठिकाणी संपूर्ण शहरातील घन कचरा टाकला जातो,व त्याद्वारे खत निर्मितीच्या नावाखाली घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्या परिसरातच जलतरण तलाव उभारण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रशासनाच्या बुद्धीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा हा निर्णय असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, मुख्याधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने व कोणतीही पारदर्शकता न ठेवता हा प्रकल्प राबवला जात आहे. दुर्गंधीने व्यापलेल्या त्या भागात सामान्य नागरिक पोहायला जाण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याने, हा प्रकल्प केवळ आणि केवळ “खिसे भरण्याचा” प्रकार असल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे.“सामान्य जनतेच्या पैशांचा असा उघड गैरवापर होत असताना प्रशासन गप्प का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक आरोग्याचा विचार न करता घेतलेले हे निर्णय प्रशासनाच्या बेफिकीरीचे द्योतक असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.दरम्यान, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!