Food Court - दादासाहेब कन्नमवार यांची स्मृती पुसण्याचा डाव


#kannamwar
मूल (चंद्रपूर) — स्वर्गीय मारोतराव कन्नमवार उर्फ दादासाहेब कन्नमवार यांच्या स्मृती जपणाऱ्या ‘कन्नमवार सभागृह’ संदर्भात मूल शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. शहराच्या अभिमानाचे प्रतीक ठरलेले हे भव्य सांस्कृतिक सभागृह आता ‘फूड कोर्ट’मध्ये रूपांतरित करण्याच्या हालचालींमुळे कन्नमवार प्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
गरीब भटक्या-विमुक्त कुटुंबातून पुढे येत महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री आणि दुसरे मुख्यमंत्री पद गाठणाऱ्या कन्नमवार यांची कर्मभूमी असलेल्या मूल शहरात त्यांच्या स्मारकाचा अभाव होता. ही खंत ओळखून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षात असतानाही संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करत कोट्यवधी रुपयांचा निधी उभा केला आणि ‘मा. सा. कन्नमवार सांस्कृतिक सभागृह’ उभारले. वातानुकूलित, सुसज्ज अशा या वास्तूमुळे शहरात शासकीय बैठका, नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल वाढली आणि कन्नमवार यांच्या स्मृतींना नवा उजाळा मिळाला.
मात्र आता मूल नगरपरिषदेकडून या स्मारकाच्या परिसरात ‘फूड कोर्ट’ उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यासाठी सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. “आज ‘कन्नमवार भवन’ म्हणून ओळखली जाणारी वास्तू उद्या ‘फूड कोर्ट’ म्हणून ओळखली जाईल, आणि त्यामुळे कन्नमवार यांच्या स्मृती पुसण्याचा प्रयत्न होईल,” असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
दादासाहेब कन्नमवार हे मूळचे काँग्रेसचे. मात्र त्यांनी विकासात पक्ष पाहिला नाही. त्यांची ही भूमिका लक्षात घेऊन भाजपचे आमदार असलेले मुनगंटीवार यांनी त्यांचे स्मृतीला साजेसा स्मारक तयार करण्यास पुढाकार घेतला. तो पूर्णत्वासही आला. आता मात्र नगर परिषदेत काँग्रेसची सत्ता असताना, कन्नमवारांची स्मृती पुसण्याचा काम केल्या जात असल्याचा आरोप होत आहे. उल्लेखनीय म्हणजे, ज्या बेलदार समाजातून कन्नमवारजी होते, त्याच समाजाचे विलास कागदेलवार, विवेक मुत्तेलवार, राहुल प्रेमलवार हे तीन नगरसेवक यावेळी निर्वाचित झाले, ते सभागृहात कोणती भूमिका घेतात याकडे समाजासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेविका प्राची आक्केवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार, मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना पत्र देत हा प्रस्ताव तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. “कन्नमवार यांचे स्मारक हे केवळ इमारत नाही, तर मूल शहराच्या इतिहासाचा आणि स्वाभिमानाचा भाग आहे. त्याची ओळख कायम ठेवलीच पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नगरपरिषदेच्या या निर्णयामागील उद्देशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, ‘विकासाच्या नावाखाली स्मारकांची ओळख पुसली जात आहे का?’ असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, आणि कन्नमवार भवनाची ओळख जपली जाते का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे

Food cort करिता कोणाचा विरोध नाही, पर्यायी दुसरी जागा शोधता येते, मूल शहरात देखणे छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल रिकामे बेवारस पडलेले आहे, त्याचाही वापर करता येतो मात्र कन्नमवारांचे झालेले ऐतिहासिक कार्य पुसण्याचा प्रयत्न का केला जातो? हा प्रश्न नागरिक विचारत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!