“फूड कोर्ट निर्णयावर आम. मुनगंटीवार संतप्त – जिल्हाधिकाऱ्यांना दिले आदेश”
पब्लिक पंचनामा इम्पॅक्ट | कन्नमवार भवन वादात मोठी घडामोड
मूल (चंद्रपूर) : ‘पब्लिक पंचनामा’मध्ये कन्नमवार भवन परिसरात प्रस्तावित फूड कोर्ट संदर्भातील बातमी प्रसिद्ध होताच शहरात मोठी खळबळ उडाली असून, या वृत्ताचा तात्काळ परिणाम प्रशासन आणि राजकीय स्तरावर उमटताना दिसत आहे.
बातमीची दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नगरपरिषदेच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून दादासाहेब कन्नमवार यांचा अपमान करणारा आहे,” असे त्यांनी स्पष्ट करत, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना हा निर्णय तातडीने रद्द करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती दिली.
कन्नमवार भवन हे दादासाहेब कन्नमवार यांच्या स्मृतींचे प्रतीक असल्याने शहरातील नागरिकांमध्ये, विशेषतः बेलदार समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. समाजातील पदाधिकारी व नागरिकांनी नगरसेवकांशी तातडीने चर्चा करून निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. नगरसेवकांनीही हा निर्णय रद्द करण्यासाठी नगरपरिषदेला भाग पाडण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, नगरपरिषदेचे सभापती विलास कागदेलवार व नगरसेवक विवेक मुत्त्यालवार यांनी नगरपरिषदेला लेखी पत्र देऊन रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले व कन्नमवार सभागृहात फूड कोर्ट प्रस्तावाला ठाम विरोध दर्शविला आहे.
या प्रकरणाचे पडसाद समाजमाध्यमांवरही उमटले असून, विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर नगरपरिषदेच्या निर्णयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
बेलदार समाज संघटनेचे प्रमुख संदीप कारमवार यांनी समाजाच्या भावना तीव्र असल्याचे सांगत, या निर्णयाविरोधात लवकरच लेखी आक्षेप नोंदविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच बाजार समितीचे संचालक राजू कन्नमवार व गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य विवेक गोर्लावार यांनीही कन्नमवार स्मारकाची मूळ ओळख कायम ठेवण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, चंद्रपूर येथील बेलदार समाज संघटनेचे काही पदाधिकारी प्रियदर्शनी सभागृह येथे विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी करणार असल्याचे आमचे प्रतिनिधीला सांगितले.
‘पब्लिक पंचनामा’च्या बातमीमुळे स्थानिक तसेच राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर तात्काळ हालचाली सुरू झाल्या असून, नगरपरिषदेचा निर्णय अधिकृतपणे रद्द होतो का आणि कन्नमवार भवनाची मूळ ओळख कायम राहते का, याकडे संपूर्ण मूल शहराचे लक्ष लागले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!