रोजगार हमी मजुरांची ग्रामसभेत उपस्थिती? वासेरात दारू दुकान परवानगीवरून नवा वाद
रोजगार हमी मजुरांची ग्रामसभेत उपस्थिती? वासेरात दारू दुकान परवानगीवरून नवा वाद
१७२ मजुरांना प्रत्येकी ₹५०० देऊन ग्रामसभेत आणल्याचा आरोप; मस्टर आणि उपस्थिती नोंदवहीतील क्रमांक जुळल्याचा दावा
वासेरा वार्ता | सिंदेवाही
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील वासेरा ग्रामपंचायतीत देशी दारू दुकानाला ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी घेण्यात आलेल्या ग्रामसभेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. रोजगार हमी योजनेवरील (मनरेगा) मजुरांची उपस्थिती ग्रामसभेत दाखविल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मनरेगा अंतर्गत कामावर असलेल्या तब्बल १७२ मजुरांना प्रत्येकी ५०० रुपये देऊन ग्रामसभेला आणण्यात आले. विशेष म्हणजे, रोजगार हमी योजनेच्या मस्टरवरील अनुक्रमांक आणि ग्रामसभेच्या उपस्थिती नोंदवहीतील क्रमांक एकसारखे असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे एकाच वेळी मजूर कामावर उपस्थित आणि ग्रामसभेत उपस्थित कसे दाखवले गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यापूर्वीही ग्रामसभेची जाहीर नोटीस व मुनादी न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. नोटीसमध्ये स्पष्टपणे ‘दारू दुकानास ना हरकत प्रमाणपत्र’ हा विषय नमूद न करता ‘CLL-III’ असा संदिग्ध उल्लेख करून ग्रामस्थांची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामसभेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, रोजगार हमी योजनेच्या संभाव्य गैरवापराचा मुद्दा पुढे आल्याने प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!