चार मैत्रिणी, एकच रूम, एकच स्वप्न आणि पुढे जे घडलं ते थक्क करणारं..!

जिद्द, चिकाटी आणि मैत्रीचा 'खाकी' विजय! एकाच खोलीत राहणाऱ्या ४ मैत्रिणींची चंद्रपूर पोलीस दलात निवड



चंद्रपूर: "स्वप्न पाहायची आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने पेटून उठायचं," याचाच प्रत्यय चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलीस भरती निकालातून आला आहे. ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या आणि एकाच खोलीत राहून अभ्यासाचे नियोजन करणाऱ्या वेगवेगळ्या गावात राहणाऱ्या, चार जिवलग मैत्रिणींनी एकाच वेळी पोलीस दलात भरती होऊन एक नवा इतिहास रचला आहे.

मैत्रीतून यशाकडे वाटचाल

​मूळच्या मूल तालुक्यातील ग्रामीण भागातील असलेल्या या चार मैत्रिणी चंद्रपूर पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून जिल्हा मुख्यालयी एकत्र भाड्याच्या खोलीत राहत होत्या. घरची परिस्थिती बेताची असली तरी, एकमेकींना साथ देत त्यांनी या कठीण प्रवासात पाय घट्ट रोवले.

निवड झालेल्या रणरागिणी:

  1. कु. प्रतीक्षा संजय सोनुले (रा. केळझर)
  2. कु. पूजा रमेश मांदाडे (रा. बेंबाळ)
  3. कु. सुप्रिया राजू बालुगवार (रा. बेंबाळ)
  4. कु. प्रियाली प्रकाश वासेकर (रा. सिंतळा)

असे साध्य केले यश

​पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेली शारीरिक चाचणी (मैदानी) आणि लेखी परीक्षा या दोन्ही आघाड्यांवर या मुलींनी आपले कसब दाखवले. आपल्या मार्गदर्शकांच्या आणि शिक्षकांच्या सल्ल्यानुसार योग्य नियोजन करून त्यांनी सातत्यपूर्ण सराव केला. मैदानी चाचणीत उत्तम गुण मिळवल्यानंतर, शेवटचा टप्पा असलेल्या लेखी परीक्षेतही या चौघींनी बाजी मारली आणि गुणवत्ता यादीत (Merit List) स्थान मिळवून आपला विजय सुनिश्चित केला.

एकाच वेळी, एकाच ठिकाणी यश!

​या यशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या चौघीही:

  • ​एकाच तालुक्यातील आहेत.
  • ​एकाच खोलीत (रूममेट्स) राहतात.
  • ​एकाच अभ्यासिकात (Library) अभ्यास करतात.
  • ​आणि आता एकाच जिल्ह्यात, एकाच वेळी पोलीस म्हणून रुजू होणार आहेत.
​पोलीस भरतीच्या इतिहासात अशाप्रकारे एकाच रूममधील चारही मुलींची निवड होण्याची ही दुर्मिळ आणि अभिमानास्पद घटना मानली जात आहे.

आपल्या जिद्दीच्या जोरावर आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या या 'चौघी' आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.

(मुन्ना कोटगले यांचे फेसबुक पेज वरून साभार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!