मूल शहरात पुन्हा भीषण आग; इंदिरानगर परिसरात धोक्याची घंटा
मूल शहरात पुन्हा भीषण आग; इंदिरानगर परिसरात धोक्याची घंटा
मूल शहरातील इंदिरानगर वार्डातील सरकारी गोडाऊनच्या मागे आज भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, बातमी देईपर्यंत अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले नव्हते.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत स्वतःच आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. आगीची तीव्रता लक्षात घेता परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच नगरसेविका प्राची आक्केवार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी प्रशासनाला आग तातडीने आटोक्यात आणण्याचे निर्देश दिल्याची माहिती मिळाली.
विशेष म्हणजे, या गोडाऊनला लागूनच इंदिरानगर झोपडपट्टी आहे. त्यामुळे आग वेळीच नियंत्रणात न आल्यास मोठा अनर्थ घडण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाई करून आग पूर्णपणे विझवण्याची मागणी केली आहे.
चार दिवसांपूर्वीच गांधी चौक परिसरातही भीषण आग लागल्याची घटना घडली होती. आठवडाभराच्या आतच शहरात दुसऱ्यांदा आग लागल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. प्रशासनाने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!