स्वच्छतेच्या मागणीसाठी वरोऱ्यात अनोख्या पद्धतीने आंदोलनं... हातात झाडू, पाठीवर पंप, डोक्यावर कुंडे घेऊन आंदोलन....
स्वच्छतेच्या मागणीसाठी वरोऱ्यात अनोख्या पद्धतीने आंदोलनं...
वरोरा...जगदीश पेंदाम
शहरात स्वच्छतेच्या गंभीर प्रश्नावर नगरसेवकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडत नगरपरिषद प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून शहरात कचऱ्याचे ढिग साचणे, नाल्या तुंबणे आणि पाणीपुरवठा विस्कळीत होणे या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार सूचना देऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी घमिले आणि पावडे डोक्यावर घेत, बँडबाजाच्या गजरात नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला.
भाजपा गटनेते अक्षय भिवदरे आणि शिवसेना शिंदे गटाचे गटनेते खेमराज कुरेकार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा पार पडला. नगरसेविका लीना संजय गयनेवार यांच्या निवासस्थानापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.
या आंदोलनात माजी नगरसेवक राजेश महाजन यांच्यासह नगरसेविका लता हिवरकर, लीना संजय गयनेवार, मनीषा दानव, शालिनी आत्राम, वर्षा पिसाळ, सीमा तडस, नुपूर तेला तसेच नगरसेवक प्रवीण चिमुरकर, कुणाल रुयारकर आदींची उपस्थिती होती.यावेळी स्वच्छतेसाठी आवश्यक मनुष्यबळाची कमतरता असल्याचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, दलित वस्ती निधीतून प्रस्तावित डेकोरेटिव्ह स्ट्रीट लाईट प्रकल्पावरही नगरसेवकांनी आक्षेप घेतला. आधीच प्रकाशव्यवस्था उपलब्ध असताना नव्याने काम करणे हा शासन निधीचा अपव्यय असल्याचा आरोप करण्यात आला.नगरसेवकांनी संबंधित निविदा तात्काळ रद्द करून नाली, रस्ते, पाणीपुरवठा आणि शौचालय यांसारख्या मूलभूत कामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली आहे.प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!