जागा ठरवलीच नाही… तरी दारू दुकानाला परवानगी!
जागा ठरवलीच नाही… तरी दारू दुकानाला परवानगी!
मोघम ठरावावर देशी दारूची ‘ना-हरकत’; वासेरा ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप
मूल | सिंदेवाही
सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वासेरा ग्रामपंचायतीत नियम, कायदे आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत देशी दारू दुकानाला परवानगी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दारू दुकानासाठी आवश्यक असलेला निश्चित जागेचा ठराव, सर्वे क्रमांक, सीमा आणि नकाशा यांचा कुठलाही स्पष्ट उल्लेख नसतानाही केवळ मोघम आणि दिशाभूल करणाऱ्या ग्रामसभेच्या ठरावाच्या आधारे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
शासनाच्या स्पष्ट नियमांनुसार दारू दुकानासाठी निश्चित जागा व त्याचा तपशील ग्रामसभेच्या ठरावात असणे बंधनकारक असताना, संबंधित सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाने संगनमताने नियमांना केराची टोपली दाखविल्याचा आरोपही होत आहे.
या निर्णयामुळे गावातील शाळा, देवस्थान, वस्ती तसेच महिला व तरुणांवर होणाऱ्या सामाजिक परिणामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी हा ठराव तात्काळ रद्द करून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषी आढळणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही पुढे आली आहे.
यासंदर्भात गटविकास अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!