सावली – चारगाव मार्गावरील पुलाच्या बांधकामाची विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केली पाहणी
सावली - सावली ते चारगाव या महत्त्वाच्या मार्गावरील सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाची विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली. या पुलामुळे परिसरातील नागरिकांना वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या अडचणी दूर होणार असून गावांच्या दळणवळणाला मोठा दिलासा मिळणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीचा आढावा घेत आ. वडेट्टीवार यांनी कामाची गुणवत्ता राखून निर्धारित कालावधीत पूल पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या सुरक्षेला आणि सोयीला प्राधान्य देत काम वेगाने पूर्ण करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पुलामुळे सावली, चारगाव तसेच परिसरातील अनेक गावांमधील प्रवास सुकर होणार असून शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
आ. वडेट्टीवार म्हणाले की, मतदारसंघातील मूलभूत सुविधांना प्राधान्य देत रस्ते, पूल, पाणीपुरवठा आणि आरोग्य सेवा यांसारख्या विकासकामांना गती दिली जात आहे. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊनच विकासाची कामे राबवली जात असून प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हा आपला ध्यास असल्याचे त्यांनी सांगितले.
या पाहणीवेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहणे, महिला आघाडी अध्यक्षा उषा भोयर, माजी सभापती विजय कोरेवार, कृष्णा राऊत, विजय मुत्यालवार, सचिन संगीडवार, श्रीकांत बहिरवार, राजू वलके, महादेव कुमरे, शीला गुरणुले, यांचेसह स्थानिक पदाधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!