मुंडाळा येथे अवैध दारूबंदीसाठी ग्रामस्थांचा पुढाकार
सावली : मुंडाळा येथील हनुमान मंदिर परिसरात ग्रामसभेच्या वतीने दारूबंदी ठरावाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष कायदेशीर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. ग्रामसभेत एकमताने संमत झालेल्या दारूबंदी निर्णयाची अंमलबजावणी कशी करावी व त्यासंबंधी कायदेशीर बाबींची माहिती देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाथरीचे ठाणेदार डोर्लीकर यांचे अध्यक्षतेखाली मार्गदर्शन झाले.
अध्यक्षीय भाषणात ठाणेदार डोर्लिकर यांनी दारूबंदी संदर्भातील कायदे, तसेच गावातील शांतता व सुव्यवस्था राखण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करीत “दारूबंदी ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून गावाच्या सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक विकासासाठी आवश्यक पाऊल आहे,”. तसेच ज्याचावर अनेक गुन्हे दाखल आहेत अशा अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर उपविभागीय दंडाधिकारी (एस डी एम) कडे केस पाठवून या गुन्हेगारांवर कलम ५६,५७ प्रमाणे हद्दपारीची कठोर कारवाई केली जाईल, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून दारूबंदी समितीच्या अध्यक्षा अनिता गेडाम, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ब्राह्मानंदजी शेंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शामकरणजी भरडकर, पोलीस पाटील शालिकजी भरडकर, निलेश अलुरवार, ज्ञानेश्वरजी लोंढे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसचालन सिबू कोकोडे यांनी केले तसेच प्रास्ताविक ब्रम्हानंदजी शेंडे यांनी केले. सर्व मान्यवरांनी गावातील युवक व ग्रामस्थांना व्यसनमुक्तीचा संदेश देत दारूबंदी मोहिमेला सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला. गावाच्या शांतता, आरोग्य आणि सुरक्षित भविष्यासाठी दारूबंदीचा ठराव प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!