बाजार समितीचा ढिसाळ कारभार उघड; पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान



कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे काल सायंकाळी झालेल्या पावसामुळे बाजार समितीच्या आवारात ठेवलेले शेतकऱ्यांचे सुमारे हजारो क्विंटल धान भिजून खराब झाले. अचानक आलेल्या पावसामुळे आवारात उघड्यावर ठेवलेले धान पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मूल बाजार समितीच्या आवारात दरवर्षी पावसाळ्यात धान भिजण्याची समस्या वारंवार घडत असतानाही यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांसाठी शेड, ताडपत्री किंवा सुरक्षित साठवण व्यवस्था उपलब्ध करून देण्यात बाजार समिती प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
यामुळे दरवर्षी पावसाच्या सरी आल्या की आवारात ठेवलेले धान भिजते आणि शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होते. मात्र याकडे बाजार समितीचे पदाधिकारी आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, बाजार समितीचे सचिव अजय गंटावार हे मागील चार महिन्यांपासून आजारपणामुळे दीर्घ रजेवर असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांनी आपल्या पदाचा प्रभार कोणाकडेही न दिल्याने बाजार समितीचे प्रशासन अक्षरशः वाऱ्यावर असल्याची चर्चा सुरू आहे.
प्रशासनातील या ढिसाळ कारभाराचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत असून, मूल कृषी उत्पन्न बाजार समिती नेमके शेतकऱ्यांचे की इतर कोणाचे भले करते आहे? असा संतप्त सवाल आता शेतकरी उपस्थित करीत आहेत.
शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!