तळोधी बाळापूरात १९ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ



तळोधी (बा.) : 
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तळोधी बाळापूर येथे शुक्रवारी, २१ ऑगस्ट रोजी सकाळी १९ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. जवाहर सेवा सहकारी सोसायटीच्या पाठीमागील परिसरात हा मृतदेह आढळून आला. मृत तरुणाचे नाव राहुल विजय मेश्राम (वय १९), रा. सराई वॉर्ड, तळोधी बाळापूर, असे आहे.
राहुल हा ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेले विजय मेश्राम यांचा मोठा मुलगा होता. राहुल हा केवळ कुटुंबीयांमध्येच नव्हे, तर तळोधी बाळापूर परिसरात एक उत्साही डान्सर म्हणूनही परिचित होता. विविध सामाजिक, सांस्कृतिक तसेच स्थानिक कार्यक्रमांमध्ये तो नेहमी उत्स्फूर्तपणे सहभागी होत डान्स सादर करीत असे. आपल्या नृत्यकलेमुळे त्याने मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता. मनमिळावू आणि उत्साही स्वभावामुळे मित्रपरिवार व चाहत्यांमध्ये तो विशेष लोकप्रिय होता. त्याच्या आकस्मिक मृत्यूची वार्ता समोर येताच चाहत्यांसह मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शुक्रवारी सकाळी राहुलचा मृतदेह आढळून आल्यानंतर घटनेची माहिती तातडीने तळोधी पोलीस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व उपविभागीय पोलीस अधिकारी झरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार राहुल गूहे यांच्या नेतृत्वात मेजर वाकडे, स्वप्नील चांदेकर, संदेश देवगडे व इतर पोलीस अमलदारांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून आवश्यक पुरावे व नमुने संकलित केले. त्यानंतर राहुल मेश्राम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, राहुलचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. हा मृत्यू आत्महत्या आहे की अन्य काही कारणामुळे झाला, याबाबतही पोलिसांकडून सध्या कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपासणी आणि पोलिसांच्या तपासातूनच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा अंदाजांवर विश्वास न ठेवता पोलिस तपासाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. घटनास्थळाचा पंचनामा, फॉरेन्सिक तपास, शवविच्छेदन अहवाल तसेच उपलब्ध इतर पुराव्यांच्या आधारे तळोधी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
अवघ्या १९व्या वर्षी राहुल मेश्राम याचा झालेला आकस्मिक मृत्यू अनेक प्रश्न निर्माण करणारा ठरला आहे. आपल्या नृत्यकलेने आणि मनमिळावू स्वभावाने अनेकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या राहुलच्या जाण्याने मित्रपरिवार व चाहत्यांमध्ये दुःखाची छाया पसरली आहे. या घटनेमागील नेमके कारण काय, याकडे तळोधी बाळापूर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले असून, पोलिस तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतरच या दुर्दैवी घटनेचे सत्य स्पष्ट होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!