सावलीतील चिखली गाव राज्यात पहिले तर जिबगाव दुसरे - माझी वसुंधरा स्पर्धेत कोट्यावधीचे पुरस्कार जाहीर

 

सावलीतील चिखली गाव राज्यात पहिले तर जिबगाव दुसरे - माझी वसुंधरा स्पर्धेत कोट्यावधीचे पुरस्कार जाहीर 

सावली : माझी वसुंधरा अभियान ५ अंतर्गत तालुक्यातील चिखली व जिबगाव हे राज्यात चमकले असून चिखलीने प्रथम दीड कोटी रुपयाचे तर जिबगाव ने ७५ लाख रुपयाचे बक्षीस घेतले आहे. माझी वसुंधरा अभियानात सावली पंचायत समितीने विभागीय स्तरावर उत्कृष्ट काम केल्याने अव्वल स्थान मिळविले आहे. यामुळे चिखलीच्या सरपंच रेखाताई बानबले व जिबगावचे सरपंच पुरुषोत्तम चुधरी यांचे कौतुक होत आहे. 

          चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील चिखली व जिबगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक २०२१ मध्ये झाली त्यात चिखलीच्या सरपंचपदी रेखाताई बानबले तर जिबगावच्या सरपंचपदी पुरषोत्तम चुधरी हे विराजमान होत विकासाचा संकल्प केला. निसर्गाच्या पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर आधारित जीवनपद्धती अंगीकारल्याशिवाय मानवजातीला निसर्गासोबत शाश्वतरीत्या जगणे शक्य नाही. जैवविविधतेचे अस्तित्व टिकवण्यासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहभागातून पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना राबवून निसर्गपूरक जीवनशैली विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांनी दिनांक २ ऑक्टोबर २०२० पासून “माझी वसुंधरा” अभियान सुरू केले आहे. या अभियानात सहभाग घेण्यासाठी दोन्ही सरपंचानी गावातील लोकांना सोबत घेऊन  महाराष्ट्र शासनातर्फे पर्यावरण व वातावरणीय विभागामार्फत पर्यावरणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध स्तरावर  स्पर्धा घेण्यात आले. पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी माझी वसुंधरा अभियांन ग्रामपंचायतिकडून राबविण्यात आले.

नुकतीच राज्यातील माझी वसुंधरा स्पर्धेत भाग घेऊन पुरस्कार प्राप्त करणाऱ्या यादीत चिखलीला १ कोटी व भूमी अभियांचे ५० लाख तर जिबगावला ७५ लाखाचे बक्षीस जाहीर झाले आहे. राज्यात सावली तालुक्यातील गावे चमकल्याने सावली तालुक्यासाठी अभिमानाची बाब असल्याने इतर गावांनी आदर्श घेण्याचे आवाहन केल्या जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.          

          माझी वसुंधरा अभियान ५ अंतर्गत अभियानासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार,   सहाय्यक गटविकास अधिकारी राजू परसावार, ग्राम अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, कार्यालयीन विभाग प्रमुख, ग्रामपंचायत अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर व शिपाई, ग्राम रोजगार सेवक, सि.आर.पी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!