चंद्रपूर महापौर निवडणूक: काँग्रेसने घेतला मोठा निर्णय



चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासंघर्षावर आता काँग्रेसने आत्मपरीक्षणाची मोहीम सुरू केली आहे. बहुमताच्या उंबरठ्यावर असतानाही महापौरपद हुकल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला असून, याची अधिकृत घोषणा काँग्रेस नेते रमेश चैनीथाला  Ramesh Chennithala यांनी केली आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे 27 उमेदवार विजयी झाले होते, काँग्रेस सोबत आघाडीत निवडणूक लढविलेल्या जनविकास सेनेचे तीन नगरसेवक विजयी झाले होते आणि पक्ष स्पष्ट बहुमतात असल्याचे चित्र होते. मात्र, अंतर्गत मतभेदांमुळे सत्तास्थापनेची संधी हातातून निसटली. काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर Pratibha Dhanorkar आणि ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांच्यातील मतभेद टोकाला गेल्याची चर्चा रंगली. याचबरोबर उबाठा गटाने साथ न दिल्याने समीकरणे अधिकच बिघडली.
या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये भाजपने मात्र अचूक डाव टाकला. भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी राजकीय रणनीती राबवत भाजपच्या संगीता खांडेकर Sangeeta Khandekar यांना महापौरपदी विराजमान करण्यात यश मिळवले. बहुमताच्या जवळ असूनही काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नाही, ही बाब राज्यभर चर्चेचा विषय ठरली.
आता या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी आणि नेमकी चूक कुठे झाली याचा तपास करण्यासाठी काँग्रेसने चौकशी समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालानंतर पक्षांतर्गत जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चंद्रपूरमधील हा सत्तानाट्यप्रसंग काँग्रेससाठी आत्मपरीक्षणाची कसोटी ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!