मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी संपामुळे जिल्ह्यातील विकास कामावर मोठा परिणाम



सावली :-   
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 
 कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा मार्ग अवलंबिला असून चंद्रपूर जिल्ह्यातील मनरेगाचे सर्व कंत्राटी कर्मचारी मुंबईत सुरू असलेल्या आझाद मैदानावर आंदोलनात सहभागी झालेले आहेत. याचा थेट परिणाम चंद्रपूर जिल्ह्यातील मनरेगांशी संबंधीत विकास कामावर होत असून जवळपास सर्वच कामे ठप्प झालेली आहेत.
     जिल्ह्यात सुरू असलेल्या घरकुल, सिंचन विहिरी, जनावरांचे गोठे, कुक्कुटपालन शेड, शेळी शेड, पांदन रस्ते, वृक्ष लागवड यासारखे शेतीपूरक व ग्रामीण विकासाशी संबंधित असंख्य कामे ठप्प झाली आहेत. सध्या सुरू असलेल्या "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात "मनरेगा अत्यंत महत्त्वाचा घटक असून या आंदोलनामुळे या अभियानावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील रोजगार हमीची सर्वच कामे बंद पडली असून याचा सर्वाधिक फटका मजूर वर्गात बसत आहे. अनेक मजुरांना रोजगार थांबल्याने त्यांच्या कुटुंबाची आर्थिक कोंडी निर्माण झाली असून ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून अत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सविस्तर निवेदन दिले होते, मात्र त्याची दखल न घेतल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला लागल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर जिल्ह्यातून या आंदोलनात सर्वच कर्मचारी सहभागी झाले आहेत. सुरुवातीला काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करत सर्व कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून बसण्याचा निर्णय घेतला. दिनांक 23 जानेवारीपासून सुरू असलेल्या या राज्यव्यापी आंदोलनामुळे प्रशासकीय यंत्रणेची कोंडी निर्माण झाली असून शासन यावर काय तोगा काढणार?याकडे कर्मचाऱ्यांसह ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. शासन स्तरावर वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असून दिनांक 11 फेब्रुवारी पासून अन्नत्याग आंदोलनाचा इशाराही कर्मचाऱ्यांनी  दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!