बिलासपूर एक्सप्रेसमध्ये प्रामाणिकपणाचा प्रवास : पैसे नव्हे, माणुसकी जिंकली! विक्की चावला व मित्रांचा आदर्श
तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेलेले विक्की चावला, आकाश कावळे, संदीप मोहाबे, नवनीत शेंडे, गिरीश गुरूनुले, सुनील लांजेवार, हरी रायपुरे आणि भुपेश वाढई हे मित्र दर्शनानंतर आपल्या गावाकडे परतत होते.
नेल्लूर ते बल्हारशा या प्रवासादरम्यान, बिलासपूर एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12852) मध्ये रात्र सुमारे दोन वाजताच्या सुमारास सर्व प्रवासी गाढ झोपेत असताना, डब्यात एक प्रसंग घडला—जो आजही माणुसकी जिवंत आहे, याची साक्ष देणारा ठरला.
डब्यातून जात असताना खाली पडलेले एक पाकीट विक्की चावला यांच्या नजरेस पडले. आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात अनेकजण असे पाकीट पाहून पुढे निघून गेले असते; पण विक्की आणि त्यांच्या मित्रांनी तसे केले नाही. त्यांनी ते पाकीट उचलून उघडून पाहिले असता त्यात तब्बल ३० हजार रुपये असल्याचे दिसून आले.
क्षणाचाही विलंब न करता विक्की यांनी ही बाब आपल्या मित्रांच्या निदर्शनास आणून दिली. सर्वांनी मिळून पाकिटाच्या मालकाचा शोध सुरू केला. तपासाअंती वरच्या बाकावर गाढ झोपेत असलेल्या बालाघाट येथील एका प्रवाशाचे हे पाकीट असल्याचे स्पष्ट झाले.
विक्की चावला व त्यांच्या मित्रांनी त्या प्रवाशाला झोपेतून उठवून, त्याच्या हातात त्याचे पाकीट सुरक्षितपणे सुपूर्द केले.
आपले कष्टाचे, मेहनतीचे पैसे अशा प्रामाणिकपणाने परत मिळाल्याचे पाहून त्या प्रवाशाच्या डोळ्यांत अश्रू तरळले. भरल्या डोळ्यांनी त्याने विक्की चावला व त्यांच्या सर्व मित्रांचे मनापासून आभार मानले.
हा प्रसंग केवळ हरवलेले पैसे सापडल्याची बातमी नाही, तर आजही समाजात प्रामाणिकपणा, सचोटी आणि माणुसकी जिवंत आहे, याचा जिवंत दाखला आहे.
अशा व्यक्तींमुळेच समाजावरचा विश्वास टिकून आहे—आणि अंधाऱ्या रात्रीतही माणुसकीचा प्रकाश उजळून निघतो.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!