वनवणवा लागू न देणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी – किशोर देऊळकर

शहर - प्रतिनिधी  ( चंदू मडकवार )

चिमूर : - वनवणवा प्रतिबंधक उपाययोजना तसेच मानव-वन्यप्राणी संघर्षाबाबत जनजागृती करण्यासाठी वन विभाग चिमूर यांच्या वतीने चिमूर येथे एकदिवसीय कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली. दरवर्षीप्रमाणे यंदाही चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नागरिकांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
         कार्यशाळेत जंगलांचे संरक्षण, वनवणव्यामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान, वन्यप्राण्यांचे संरक्षण तसेच मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी घ्यावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उन्हाळ्याच्या काळात होणाऱ्या वनवणव्यांना नागरिकांनीच प्रतिबंध करणे अत्यंत गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
         कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविताना वन परिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर यांनी, “वनवणवा लागू न देणे ही केवळ वन विभागाची नव्हे तर समाजातील प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. नागरिकांच्या सहकार्याशिवाय जंगलांचे संरक्षण शक्य नाही,” असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमोद गौरकर यांनी वन्यप्राणी व मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी खबरदारी, माहिती आणि संयम आवश्यक असल्याचे सांगितले.
       कार्यक्रमाचे संचालन यु. बी. लोखंडे यांनी केले, तर ए. ई. नेवारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळेस नागरिक, शेतकरी व वन विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!