मूल नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी राकेश रत्नावार यांची पाचव्यांदा निवड

मूल नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी राकेश रत्नावार यांची पाचव्यांदा निवड


मूल नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी युवा नेतृत्व राकेश रत्नावार यांची पाचव्यांदा निवड करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली मूल नगर परिषदेत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर राकेश रत्नावार यांची गटनेतेपदी निवड झाली असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांना उपाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. ही निवड त्यांच्या दीर्घकालीन अनुभव, जनसेवा आणि संघटन कौशल्याची पोचपावती मानली जात आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या राकेश रत्नावार यांनी अत्यंत कमी वयात राजकारणात प्रवेश करून जनतेशी थेट नाळ जोडली. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ते मूल नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. नगरसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांनी सलग पाच वर्षे बांधकाम सभापतीपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. पदावर असोत किंवा नसोत, ते वर्षभर जनसेवा, रूग्णसेवा, सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय राहिले असून त्यामुळे बहुजन समाजातील युवकांमध्ये त्यांचे नेतृत्व अधिक ठळकपणे पुढे आले आहे.
प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी दुसऱ्यांदा काँग्रेसकडून निवडणूक लढवून विजय मिळविला. त्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून येत उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. विशेष म्हणजे स्वतःचा वॉर्ड सोडून दुसऱ्या प्रभागातून निवडून येत इतर सहकाऱ्यांनाही विजयी करून आणण्याची राजकीय किमया त्यांनी साधली आहे.
राजकीय क्षेत्रासोबतच सहकार क्षेत्रातही राकेश रत्नावार यांचे योगदान उल्लेखनीय आहे. वयाच्या २४ व्या वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून निवडून आल्यानंतर ते गेली अनेक वर्षे सभापतीपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत निवास व्यवस्था, शेतमालाला योग्य दर, ऑनलाईन नोंदणी व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
राकेश रत्नावार यांच्या पाचव्यांदा उपाध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळे मूल शहरात व तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!