मुरूमा ऐवजी घनकचरा — मूल नगर परिषदेचा अफलातून प्रयोग!
मूल शहरात स्वच्छतेचे ढोल वाजवणारी नगर परिषद आता कचऱ्यावरच इमारत उभारण्याचा ‘नवा प्रयोग’ करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
घनकचरा प्रकल्पालगत सुरू असलेल्या नगर परिषदेच्या गोडाऊनच्या बांधकामात उंचवटा करण्यासाठी मुरूम, खडीसारख्या अधिकृत साहित्याऐवजी थेट शहरातील गोळा झालेला कचरा भरला जात आहे, अशी गंभीर बाब समोर आली आहे.
धक्कादायक म्हणजे, हा प्रकार एका-दोन कामगारांचा नसून कंत्राटदारांकडून जाणीवपूर्वक सुरू आहे, आणि याची संपूर्ण माहिती असूनही नगर परिषदेचे जबाबदार अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत.
कंत्राटदार व अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात असून त्यामुळेच या बेकायदेशीर कामाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे.
गोडावूनचे कामात भरण म्हणून कचरा टाकीत असल्याची बाब आमचे प्रतिनिधीस समजताच, कंत्राटदारांनी कचर्यावर माती टाकून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याने खाली कचरा वरून माती असा प्रकार पहायला मिळत आहे.
शहरातील घनकचरा प्रकल्पासाठी शासनाचे स्पष्ट आदेश आहेत —
कचऱ्याचे वर्गीकरण, प्रक्रिया व शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे.
मात्र स्वच्छतेच्या नावावर पुरस्कार मिरवणारी मूल नगर परिषद हा कचरा थेट बांधकामात वापरून नियमांना केराची टोपली दाखवत आहे.
हा प्रकार केवळ नियमभंग नसून भविष्यातील मोठ्या धोक्याला आमंत्रण देणारा आहे. कचऱ्यावर उभारलेली इमारत उद्या कोसळल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?
सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण आणि करदात्यांच्या पैशांशी सुरू असलेला हा खेळ अक्षम्य असल्याचे नागरिकांचे मत आहे.
दरम्यान, मूल नगरपरिषदेत नव्याने पदभार स्वीकारलेल्या पदाधिकाऱ्यांसमोर मोठी कसोटी उभी आहे.
ते या बेकायदेशीर कचरा-भरावावर लगाम घालणार की
‘वाहत्या गंगेत हात धुवून’ जुन्याच अधिकाऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवणार?
हा प्रश्न आज संपूर्ण शहरातील सामान्य नागरिक विचारत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!