मुख्य रस्त्यावर ‘गड्‌ढ्यांचे साम्राज्य’ – नागरिकांच्या जीवाला धोकाच! प्रशासनाचा मौन–जबाबदार कोण?




पवनी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - पवनी शहरातील सर्वात महत्त्वाच्या मार्गावर निर्माण झालेल्या प्रचंड गड्‌ढ्यांमुळे दोनचाकी–चारचाकी वाहनचालक, शाळकरी विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिक रोज जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या या मुख्य मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात वाहन अडकल्यास किंवा विद्यार्थ्यांचा पाय घसरल्यास मोठा अपघात होण्याची भीती सतत व्यक्त होत आहे.

शहराचे सुशोभीकरण, विकासाचे दावे करणाऱ्या प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे अजूनही दुर्लक्षच केले आहे. “एवढ्या मोठ्या मुख्य मार्गावर निर्माण झालेले गड्‌ढे कोणालाच दिसत नाहीत का?” असा संतप्त प्रश्न पवनीकर विचारत आहेत.

नगर परिषद, आमदार–खासदार यांच्या अखत्यारीतील या मार्गावरील दुरवस्थेमुळे नागरिकांच्या मनात जबाबदार कोण हा मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. भविष्यात एखादा अपघात घडल्यास त्यासाठी दोषी कोणाला धरणार? हीच चर्चा सध्या शहरभर रंगत आहे.

विशेष म्हणजे, दोन ऑक्टोबरला होणाऱ्या पवनी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हजारो नागरिक या मार्गाने जाण्या–येण्यासाठी पायवाट तयार करून जात आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असूनसुद्धा रस्त्याची दुरुस्ती न करणे म्हणजे प्रशासनाची बेफिकीरी आणि निष्काळजीपणाच आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

पवनी शहराचा विकास करण्याचे गोडवे गायले जातात; आश्वासनांचा पाऊस पाडला जातो. मात्र प्रत्यक्षात नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे होणारे दुर्लक्ष पाहता, नेतृत्व किती जागे आहे याबाबत शंका निर्माण होत आहे.

नागरिकांचे स्पष्ट मत — “विकासाच्या नावाचे आश्वासन नको, आधी गड्‌ढेमुक्त रस्ते द्या!”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!