काँग्रेस कार्यकर्ते वैभव पिंपळशेंडे यांची एकदिवसाच्या पिसीआर नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी




पोंभुर्णा /०४ डिसेंबर.

तालुक्यातील चेक वेळवा-अंधारी नदी घाटावरील रेती वाहतूक कामात अडथळे निर्माण करून खंडणी उकळल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते वैभव कुशाबराव पिंपळशेंडे (वय ३०, रा. चेक ठाणेवासना) यांना चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी दिनांक २ डिसेंबर रोजी अटक केली. त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बिएनएस) २०२३ अंतर्गत कलम ३०८(५) आणि ३५१ (२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी रेती घाटाचे कंत्राटदार शिवकुमार शंकर कोरेवार (वय ४०, रा. रामनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,पोंभुर्णा तालुक्यातील चेक वेळवा रेतीघाटाचा दोन वर्षांचा ठेका त्यांनी घेतला आहे. 
या कामात आरोपी वैभव पिंपळशेंडे यांनी मुद्दाम अडथळे निर्माण केले, घाट बंद करण्याची धमकी दिली तसेच “जिवंत सोडणार नाही” अशा धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.विविध ऑनलाइन व्यवहारांतून १ लक्ष ४३ हजार रुपये आणि घाटावरील सुपरवायझरकडून १ लक्ष रुपये रोख अशा एकूण २ लक्ष ४३ हजार रुपयांची खंडणी घेतल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.

*• पिसीआर संपल्यानंतर आरोपी न्यायालयीन कोठडीत..* 

अटकेनंतर वैभव पिंपळशेंडे यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी (पिसीआर) मिळाली होती. दुसर्‍याच दिवशी पोलिसांनी प्राथमिक चौकशी पूर्ण केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पुढील आदेशापर्यंत न्यायालयीन कोठडीत (जेलमध्ये) पाठवण्याचा आदेश दिला आहे.
या प्रकरणामुळे पोंभुर्णा तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून या घडामोडींची स्थानिक पातळीवर मोठी चर्चा सुरू आहे. तपास रामनगर पोलिसांकडून सुरू असून पुढील उकल होण्याची प्रतीक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!