राष्ट्रवादी उमेदवार आशिष करकाडे यांचा भाजपात प्रवेश; निलेश राय यांचा विजय निश्चित!

प्रभाग 10 मध्ये राजकीय समीकरणे बदलली

राष्ट्रवादी उमेदवार आशिष करकाडे यांचा भाजपात प्रवेश; निलेश राय यांचा विजय निश्चित!


मूल नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मध्ये मोठे राजकीय उलथापालथ घडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशिष करकाडे यांनी आज चक्क आपली उमेदवारी मागे घेत भाजपाचे लोकप्रिय व हेवीवेट उमेदवार निलेश राय यांना पाठिंबा जाहीर केला. करकाडे यांच्या या निर्णयामुळे आता या प्रभागात निलेश राय यांचा विजय जवळपास निश्चित झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

दरम्यान, यापूर्वीच शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप मोहबे यांनी पक्षाकडून उमेदवारी नाकारल्यानंतर काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश घेतला होता. संदीप मोहबे हे निलेश राय यांच्या प्रचारात पूर्ण क्षमतेने झोकून देत असल्यामुळे भाजपाची बाजू आणखी मजबूत झाली आहे.

प्रभाग 10 मध्ये काँग्रेस उमेदवारांनी निलेश राय यांच्या उमेदवारीवर आक्षेप दाखल केला होता. मात्र हा आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी मृदुला मोरे यांनी फेटाळला. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयातही काँग्रेस उमेदवारांना दिलासा मिळाला नाही. या सर्व प्रक्रियेचा परिणाम म्हणून या प्रभागातील निवडणूक 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.

आजच्या नामांकन परताव्याच्या मुदतीत आशिष करकाडे यांनी अधिकृतपणे उमेदवारी मागे घेत भाजपात प्रवेश केला. यानंतर बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

करकाडे म्हणाले,

“हरणारी केसचा बागुलबोवा करून काँग्रेसने केवळ निवडणूक पुढे ढकलली. त्यामुळे सर्वसामान्य मतदार, प्रशासन आणि उमेदवारांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. यासाठी काँग्रेसच जबाबदार आहे.”

करकाडे यांनी पुढे स्पष्ट केले की, ते आता निलेश राय यांच्या नेतृत्वाखाली भाजपात सक्रियपणे काम करणार आहेत.

या घडामोडींमुळे प्रभाग 10 मधील निवडणूक रंगतदार होण्याऐवजी आता एकतर्फी होण्याची चिन्हे दिसत असून, निलेश राय यांच्या विजयाकडे समीकरणे झुकताना स्पष्टपणे दिसत आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!